अकोला : मँचेस्टर – पावसानं माघार घेतल्यामुळं अखेर निर्विघ्नपणे पार पडलेल्या विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्यात विक्रमांचा पाऊस मात्र कुणालाही रोखत आला नाही. या सामन्यात भारताकडून उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनी काही विक्रमही स्वत:च्या नावावर केले.
प्रथमच गोलंदाजी
विश्वचषक स्पर्धेत भारत-पाकिस्तानमध्ये आजवर झालेल्या सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकणाऱ्या संघानं क्षेत्ररक्षण निवडण्याची ही पहिलीच वेळ होती. मँचेस्टरमधील हवामान हे यामागचं कारण होतं. याआधी भारत-पाकिस्ताननं विश्वचषक स्पर्धेत सहा सामने खेळले आहेत. मात्र, त्या प्रत्येक सामन्याच्या वेळी नाणेफेक जिंकणाऱ्या संघानं आधी फलंदाजी केली होती.
सलग दोन शतकी भागीदाऱ्या
भारतीय संघाच्या सलामीच्या जोडीनं सलग दोन सामन्यात शतकी भागीदारी करण्याची विश्वचषकातील ही पहिलीच वेळ आहे. याआधीच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा व शिखर धवन यांच्या जोडीनं १२७ धावा केल्या होत्या. त्यानंतर रविवारी पाकविरुद्ध झालेल्या सामन्यात रोहित आणि लोकेश राहुल या जोडीनं १३६ धावा फटकावल्या. याचबरोबर, विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध शतकी भागीदारी करणारी रोहित-लोकेश ही पहिली भारतीय जोडी ठरली आहे.
पाकविरुद्ध सर्वाधिक धावा
रोहित शर्मा हा विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्यानं कालच्या सामन्यात पाकच्या गोलंदाजांची धुलाई करत १४० धावा चोपून काढल्या. याबाबतीत त्यानं विराट कोहलीलाही मागे टाकलं. विराटनं २०१५च्या विश्वचषकात पाकविरुद्ध १०७ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर, रोहितनं २०१९च्या विश्वचषकातलं हे दुसरं शतक ठोकलं. त्याच्या व्यतिरिक्त इंग्लंडच्या जो रूटनं ही कामगिरी केलीय.
हसन अलीचा विक्रम
भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांची चांगलीच धुलाई झाली. पाकिस्तानच्या हसन अलीनं खराब गोलंदाजीचा विक्रमच केला. त्यानं ९ षटकात तब्बल ८४ धावा दिल्या. विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानी गोलंदाजाची ही सर्वात खराब कामगिरी आहे.
वेगवान ११ हजार धावा
पाकविरुद्ध काल ७७ धावांची खेळी करत विराटनं एकदिवसीय कारकिर्दीतील ११ हजार धावा पूर्ण केल्या. अवघ्या २२२ डावांमध्ये ही कामगिरी करताना विराट सर्वाधिक वेगानं ११ हजार धावा करणारा फलंदाज ठरला आहे. सचिन तेंडुलकरनं २७६ डावांमध्ये ११ हजारांचा टप्पा ओलांडला होता. विराटनं त्याच्यापेक्षा ५४ डाव कमी खेळून हा टप्पा गाठला.
बाबर-फखरची जोडी
भारताविरुद्धच्या सामन्यात बाबर आझम आणि फखर जमां यांची भागीदारी हीच पाकिस्तानासाठी दिलासादायक गोष्ट ठरली. या दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी १०४ धावा केल्या. विश्वचषक स्पर्धेतील भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानी जोडीची ही पहिलीच शतकी भागीदारी ठरली आहे. या दोघांनी आमिर सोहेल व जावेद मियांदादचा १९९२चा ८८ धावांचा विक्रम मोडला.
अधिक वाचा : नक्षलवाद्यांकडे पाकिस्तान निर्मित शस्त्रे ?
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola