बाळापूर (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील गावा गावा मध्ये कार्यरत असलेले पोलीस पाटील हे साध्या वेशातील पोलिसच असून ते अल्प मानधनावर करीत असलेले उत्कृष्ट कार्य कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एम राकेश कला सागर ह्यांनी केले व सदर मार्गदर्शिका तयार करणाऱ्या पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे कौतुक करून सदर मार्गदर्शिका संपूर्ण अकोला जिल्ह्यातील पोलीस पाटलांना वितरित करण्यात येईल अशी घोषणा केली.
ते रिधोरा येथे बाळापूर पोलीस स्टेशन व पोलीस पाटील एकीकरण समिती ह्यांचे संयुक्त विद्यमणाने आयोजित पोलीस पाटील मार्गदर्शन शिबीर व प्रमाणपत्र,मार्गदर्शिका वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन करतांना बोलत होते, बाळापूरचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे संकल्पने तुन तयार करण्यात आलेल्या पोलीस पाटील मार्गदर्शिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ह्या वेळी प्रास्ताविक करतांना पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी पोलीस पाटील मार्गदर्शिका तयार करण्यामागची भूमिका विशद केली.
नमूद कार्यक्रमात बाळापूर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या तसेच पोलीस पाटील ह्यांच्या मुलांनी 10 वी तसेच अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केल्याने संकेत संतोष गिरी, श्रुती गणेश गावंडे, प्रफुल किरण वानखेडे, समीर लक्ष्मण आंबेकर, पियुष प्रमोद लांडे ह्यांचा पुष्प गुच्छ व भेटवस्तू देऊन त्यांचे पालकासह भावपुर्ण सत्कार करण्यात आला.
तसेच काही दिवसां पूर्वी अकोला येथील प्रमिला ताई ओक सभागृहात मधुरंगण खानदेश अहिराणी मंच पुणे तर्फे आयोजित अकोला जिल्हा सौन्दर्य साम्राज्ञी स्पर्धेची विजेती पोलीस स्टेशन बाळापूर येथे कार्यरत असलेले कर्मचारी शुद्धोधन इंगळे ह्यांची कन्या कु पूनम हिचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला, तसेच तंटा मुक्त गाव मोहिमेत व नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकी मध्ये उत्कृष्ट काम केलेल्या पोलीस पाटलांचा प्रमाणपत्र व वृक्ष देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
ह्या वेळी पोलीस अधीक्षक एम राकेश कला सागर,अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख, बाळापूर तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, पोलीस निरीक्षक गजानन शेळके, उरल पोलिस स्टेशनचे ठाणेदार सतीश पाटील, महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील एकीकरण समितीचे निमंत्रक व रिधोरयाचे पोलीस पाटील सुजय देशमुख, पोलीस पाटील प्रमोद लांडे इत्यादी मान्यवर मंचकावर उपस्थित होते.
सर्व मान्यवरांनी उपस्थित पोलीस पाटलांना मार्गदर्शन करून पोलीस पाटलांना ग्रामीण पातळीवर काम करतांना येणाऱ्या अडचणी व त्या वरील उपाय ह्या बाबत मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालन रिधोरा येथील संजय कमल अशोक ह्यांनी बहारदार पणे करून आपल्या शेरो शायरीने उपस्थितांची मने जिंकली कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन चतारी येथील पोलीस पाटील सरदार ह्यांनी केले. कार्यक्रमाला बाळापूर व पातूर तालुक्यातील पोलीस पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा : अकोला ब्रेकिंग- लाच घेतांना अटक करतेवेळी ‘एसीबी’ च्या कर्मचाऱ्यावर पिंजरच्या ठाणेदाराने झाडली गोळी