अकोला(प्रतिनिधी)- अकोला लोकसभा मतदारसंघाकरीता झालेल्या मतदानामध्ये कोणतीही तफावत नसल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक 18 एप्रिल 2019 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली तसेच दिनांक 23 मे 2019 रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडली. मतदानाचे दिवशी (टपाली मतपत्रिका वगळता) दर्शविण्यात आलेले एकुण मतदान 11,16,763 एवढे आणि मतमोजणीचे दिवशी 11,16,902 इतके मतदान झाल्याचे आढळून आले. तसेच दिनांक 18 मे 2019 रोजी दर्शविलेली आकडेवारी व मतमोजणीचे दिवशी मतमोजणीमध्ये आढळून आलेली आकडेवारी यामध्ये 139 मतांचा फरक असल्याचे निदर्शनास आले. या 139 मतांचे फरकाबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे तक्रार देखील प्राप्त झाली होती.
याअनूषंगाने सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, 06 अकोला लोकसभा मतदारसंघ यांचा अहवाल मागविण्यात आला. यातून मतदानाच्या दिवशी झालेल्या मतदानाचा अहवाल मतदान केंद्राध्यक्ष हे फॉर्म नं 17 सी (भाग 1 ) मध्ये सादर करतात. यावेळी ईव्हीएम मशिन सिलबंद स्वरुपात प्राप्त झालेली असते. त्यामुळे प्रत्यक्ष ईव्हीएम मध्ये किती मतदान आहे याची शहानिशा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचेद्वारा केल्या जावू शकत नाही. झालेल्या मतदानाची आकडेवारी ही मतदान केंद्राध्यक्ष यांनी सादर केलेल्या दस्तऐवजांआधारेच केली जाते. दस्तऐवजांमध्ये मतदान केंद्राध्यक्ष यांनी चुकीचा आकडा नमूद केल्यास झालेल्या मतदानाबाबतच्या आकडेवारीमध्ये तीच संख्या नमूद केली जाते. तथापी मतमोजणीच्या दिवशी प्रत्यक्ष ईव्हीएम मशिन्स आणि आवश्यकता पडल्यास व्हिव्हिपॅट स्लिप मोजणी करून मतमोजणी केली जाते. त्यामुळे मतमोजणीचे वेळी आढळून आलेली मते ही अंतीम समजण्यात येतात.
आढळून आलेल्या फरकाबाबत सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, 06 अकोला लोकसभा मतदारसंघ यांचेकडून विश्लेषण प्राप्त झालेले आहे. मतदान केंद्राध्यक्ष यांनी झालेल्या मतदानाबाबतची आकडेवारी कळवितांना लेखनप्रमाद करणे, टंकलेखनात प्रमाद होणे किंवा निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्र (EDC)चे आधारे केलेले मतदान हे झालेल्या मतदानात न मोजल्यामुळे किंवा निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्राआधारे केलेल्या मतदानाची दुबार नोंद घेणे इत्यादी कारणामुळे आकडेवारीत तफावत निर्माण झाल्याचे दिसून येते. याबाबत सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे स्तरावर परिपुर्ण छाननी केली असता कोणतीही अनियमितता आढळून आलेली नाही. तथापी आता काही अफवा पसरविणारे लोक 1,00,294 मतांचा फरक असल्याबाबतची अफवा सोशल मिडियाद्वारे पसरवित असल्याचे निदर्शनास आले आहे. याअनूषंगाने स्पष्ट करण्यात येते की, 1,00,294 मतांचा फरक असण्याच्या अफवेमध्ये कोणतेही तथ्य नाही. जनमानसाची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न असल्याचे दिसून येते. नागरीकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
अधिक वाचा : ज्ञानदीप क्लासेस पातुर्डा बु. च्या पितृछत्र हरविलेल्या विद्यार्थिनींची उत्तुंग भरारी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola