अकोला : उत्तर प्रदेशातील वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेसनं पुन्हा एकदा अजय राय यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळं काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी-वाड्रा वाराणसीतून मोदींना टक्कर देणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
लोकसभा निवडणुकांसाठी पूर्व उत्तर प्रदेशमध्ये (पूर्वांचल) काँग्रेसचा प्रचार करण्याची जबाबदारी प्रियांका गांधींवर सोपवण्यात आली होती. गंगा यात्रा करत प्रचाराची सुरुवात करणाऱ्या प्रियांकांना स्थानिक जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यातूनच प्रियांका गांधींनी वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध निवडणूक लढवावी, अशी मागणी जोर धरू लागली. प्रियांकांनीही तशी तयारी दर्शवली. पक्षाच्या अध्यक्षांनी सांगितल्यास मी वाराणसीतून लढायला आवडेल, असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळं प्रियांका वाराणसीतून लढणार या चर्चेला जोर आला होता. मात्र, काँग्रेसनं आज जाहीर केलेल्या उमेदवार यादीत वाराणसीतून अजय राय यांचं नाव असल्यानं या सगळ्या चर्चा फोल ठरल्या आहेत.
२०१४मध्ये वाराणसी मतदारसंघातून नरेंद्र मोदी प्रचंड बहुमताने विजयी झाले होते. त्यावेळी आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी मोदींविरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळच्या मोदी लाटेत केजरीवाल यांचा दारुण पराभव झाला होता. आता परिस्थिती बदलल्यानं प्रियांकांनी मोदींना आव्हान देण्याची तयारी केली होती. मात्र, स्थानिक परिस्थिती पाहता प्रियांकांना ही निवडणूक जिंकणे अवघड असल्याचं पक्षश्रेष्ठींच्या लक्षात आलं. त्यामुळं अखेरच्या क्षणी काँग्रेसनं निर्णय बदलल्याचं कळतं.
गोरखपूरमधून मधुसुदन तिवारी
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा गड असलेल्या गोरखपूर मतदारसंघातून काँग्रेसनं मधुसुदन तिवारी यांना उतरवलं आहे. तिवारी यांचा सामना भाजपचे उमेदवार व प्रसिद्ध भोजपुरी अभिनेते रवी किशन यांच्याशी होणार आहे. योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा दिल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला ही जागा गमवावी लागली होती. मात्र, गोरखपूरमध्ये सपा-बसपा आघाडीकडून निवडून आलेला उमेदवारच भाजपमध्ये आल्यानं आता येथील गणितं बदलली आहेत.
अधिक वाचा : तरुणांना वेड लावणाऱ्या लोकप्रिय टिक-टॉक वरील बंदी मद्रास हायकोर्टाने उठवली
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola