अकोला (प्रतिनिधी)– भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून संपूर्ण भारतभर वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय रेल्वेच्या सहकार्याने आगामी लोकसभा निवडणूकीसाठी मतदारांमध्ये जागृती करणे व निवडणूकीत लोकांचा सहभाग वाढविण्याकरिता भारत निवडणूक आयोग व भारतीय रेल्वे यांचा संयुक्त उपक्रम म्हणून मतदार साक्षरता अभियान SVEEP या अभियाना अंतर्गत अहमदाबाद-हावडा एक्सप्रेस गाडी क्र. १२८३३ ही गाडी मतदार साक्षरता व जनजागृतीच्या दृष्टीने विविध पोस्टर्स, स्टिकर्स व घोषणांनी सजविण्यात आली होती.
मतदार जागृतीच्या या गाडीला हिरवी झेंडी दाखविण्याबाबत निवडणूक आयोगाचे निर्देश होते त्या अनुषंगाने आज दुपारी 4 वाजता अकोला रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर आलेल्या मतदार जनजागृती अहमदाबाद-हावडा एक्सप्रेसला हिरवी झेंडी. निवडणूक आयोगाचे सामान्य निरीक्षक विनोदसिंह गुंजियाल यांचे शुभहस्ते व जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे प्रमुख उपस्थितीत दाखविण्यात आले.
यावेळी राजेश खवले, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, गोपाल मावळे, जिल्हा उप निबंधक, अकोला रल्वे स्टेशन प्रबंधक ब्रिजेशकुमार, जिल्हा माहिती अधिकारी कोतुरवार, स्विपचे सहायक नोडल अधिकारी प्रकाश अंधारे, श्रीमती वर्षा खोब्रागडे, सर्जेराव देशमुख यांची उपस्थिती होती. याप्रसंगी स्विपचे उज्वल राठोड, श्रीकांत काळे, अनंता वाघ, श्रीमती नेहा शुक्ला, स्वप्नील ओळंबे यांनी रेल्वे स्थानकावरील प्रवाशांना आवाहन पत्रे वितरीत करून १८ एप्रील २०१९ रोजी मतदान करण्याचे आवाहन केले.