श्रीनगर (प्रतिनिधी) – एकीकडे आंनदोस्तव सुरू असून दुसरीकडे LOC वर कुपवाडा येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलातील चार जवान हुतात्मा झाले. यामध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलातील (सीआरपीएफ) पोलिस निरीक्षक, एक पोलिस कर्मचारी तर जम्मू-काश्मीरचे दोन पोलिस कर्मचारी हुतात्मा झाले. तसेच या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले.
जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांबरोबर आज चकमक झाली. या परिसरात दहशतवादी आल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी कुपवाडाच्या बाबागुंड भागात शोधमोहीम सुरू केली होती. एका घरात लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यामुळे चकमक सुरू झाली. या चकमकीदरम्यान चार जवानांना वीरमरण आले. तसेच चकमकीच्या जागी जमलेल्या तरुणांचा सुरक्षा दलांबरोबर संघर्ष होऊन त्यात चार जण जखमी झाले.