अकोला(प्रतिनिधी)- अकोल्यातील झी २४ तासाचे पत्रकार यांच्यावर काल रात्री काही टवाळखोर युवकांनी हल्ला चढवुन त्यांना जखमी केले होते या प्रकरणी चार आरोपी युवकाविरुद्ध जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता यामध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे तर मुख्य आरोपी फरार आहे.
अकोल्यातील झी २४ तासचे पत्रकार जयेश जगड हे आपल्या गीता नगर येथील निवासस्थानी काल रात्री आपले कामकाज आटोपून पोहचले असता घरात जात असताना तिथे असलेल्या भरतीया भवन समोर दारू पिणाऱ्या चार ते पाच गुंड प्रवृत्तीच्या युवकानि कारण नसतांना जगड यांच्याशी वाद घातला तसेच त्यांना मारहाण सुद्धा करण्यात आली.यावेळी जगड हे तेथून निघून जात असताना त्यांना दगड सुद्धा मारण्यात आले यामध्ये जगड हे जखमी झाले.यावेळी सदर ठिकाणी नागरिकांचा जमाव जमा झाल्याने सदर आरोपींनी तिथून पळ काढला.जयेश जगड यांनी याप्रकरणी जुने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता आरोपी राकेश देविदास बालानी,अमित हरिराम यादव,सुनील राजू तवर,सुरज गोयर सर्व रा गीता नगर अकोला यांच्या विरुद्ध कलम ३३६,३२३,५०४,३४ या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यामध्ये जुने शहर पोलिसांनी तत्परता दाखवत चार आरोपींपैकी तिघांना अटक केली असून मुख्य आरोपी अद्याप फरार आहे.यामध्ये आरोपींच्या दुचाक्या घटनास्थळा वरून जप्त करण्यात आल्या असून मुख्य आरोपीचा शोध जुने शहर पोलीस घेत आहेत.
*पत्रकारांची एकजूट*
जयेश जगड यांच्या वर हल्ला झाल्याची वार्ता पत्रकाराच्या समूहात पसरली असता सर्वांनी गीता नगर येथे धाव घेतली तसेच आज सकाळ पासून जुने शहर पोलीस ठाण्यात पत्रकारांनि आरोपीविरुद्ध कडक कारवाई करून अटक करण्यात यावी अशी मागणी केली होती.
*उपविभागीय पोलीस अधिकारी माने पाटील यांची तत्परता*
पत्रकार जयेश जगड यांच्या वर हल्ला प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश माने पाटील यांनी या प्रकरणाची दखल घेत तातडीने आरोपींना अटक करण्याचे आदेश देऊन जुने शहर पोलीस ठाण्याच्या डी बी पथकाने आरोपींना काही तासात अटक केली.
*जिल्हाभरातून पत्रकार संघटने कडून निषेध*
पत्रकार जयेश जगड यांच्यावर हल्ला झाल्याची बातमी पसरताच जिल्हाभऱ्यातील संघटना व पत्रकार बांधवांनी सोशल मीडिया च्या माध्यमातून जाहीर निषेध नोंदवून आरोपींविरुद्ध कडक कारवाई करून त्वरित अटक करावी अशी मागणी केली होती.
*अकोल्यात रात्रीच्या वेळी गावगुंडांची दादागिरी*
अकोल्यात गुन्हेगारी प्रवृती वाढली असून दादागिरी करून सामान्य जनतेला वेठीस धरण्याचे काम हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे युवक करीत असून काही लोकप्रतिनिधी अशा दादा लोकांना पाठबळ देऊन त्यांचे मनोबल वाढवत आहेत.जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांनी रात्रीच्या वेळी दारू पिऊन दादागिरी करणाऱ्या युवकाविरुद्ध कडक कारवाई ची मोहीम उघडणे गरजेचे आहे.कारण अकोल्यात रात्रीची वेळी घराच्या बाहेर पडणे मुश्किल झाले आहे.