अकोला(प्रतिनिधी) – ‘अमृत’ योजनेंतर्गत शहरात जलवाहिनीचे जाळे बदलणे, विविध आठ ठिकाणी जलकुंभांची उभारणी करणे तसेच नळ कनेक्शन जोडण्याचा कंत्राट मनपाने एपी अॅण्ड जीपी नामक एजन्सीला दिला आहे. संबंधित एजन्सीने शहरात तब्बल ५८ किलोमीटर अंतराची कालबाह्य झालेली जुनी जलवाहिनी वापरली असून, नळ कनेक्शन जोडण्याच्या बदल्यात अकोलेकरांच्या डोळ्यात धूळफेक केली जात आहे. यासंदर्भात मनपातील सत्ताधारी भाजप, प्रशासन तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची भूमिका संशयास्पद असून, जलवाहिनीच्या कामात १७ कोटींचा भ्रष्टाचार दडल्याचा घणाघाती आरोप शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत केला. ‘अमृत’ योजनेंतर्गत शहरात पाणी पुरवठा वितरण प्रणालीत सुधारणा करण्यासाठी ८७ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. एपी अॅण्ड जीपी नामक एजन्सीने सहा टक्के जादा दराने सादर केलेली निविदा मनपा प्रशासनाने मंजूर केली. शहरात जलवाहिनीचे जाळे टाकण्यासाठी आयएस मानांकनाचे पाइप वापरणे क्रमप्राप्त असताना एजन्सीने ५८ किलोमीटर अंतराची
एचडीपीई जलवाहिनी जुन्या आयएस मानांकनानुसार टाकल्याचा आरोप शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी केला. यासंदर्भात मनपाचे तत्कालीन आयुक्त जितेंद्र वाघ यांनी शासनाकडे आक्षेप नोंदवून कालबाह्य झालेल्या आयएस मानांकनाच्या पाइपबद्दल शासनाला विचारणा केली होती. मजीप्राच्या सदस्य सचिवांनी यावर जुन्या पाइपलाइनची जबाबदारी चक्क महापालिका व कंत्राटदारावर निश्चित केली होती. योजनेसाठी तांत्रिक सल्लागार म्हणून मजीप्राची नियुक्ती करण्यात आली असली, तरी या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताने मोठी आर्थिक अनियमितता होत असल्याचे राजेश मिश्रा यांनी सांगितले. यादरम्यान, जिल्हा नियोजन समितीच्या सभेत हा मुद्दा उपस्थित केला असता, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी जुन्या जलवाहिनीच्या बदल्यात कंत्राटदाराचे देयक थांबवून अहवाल सादर करण्याचे निर्देश मनपा आयुक्त संजय कापडणीस यांना दिले होते. मजीप्राच्या सदस्य सचिवांनी दिलेल्या पत्रावर आयुक्त कापडणीस यांनी पुन्हा सदस्य सचिव व नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांसोबत पत्रव्यवहार करून कंत्राटदाराचे ३ कोटी ३६ लाख रुपये देयक कपात करण्यासंदर्भात सूचित केले. या विषयावर सभागृहात आयुक्तांना माहिती मागितली असता महापौरांनी नकार दिल्याची माहिती राजेश मिश्रा यांनी दिली. याप्रसंगी नगरसेवक मंगेश काळे, गजानन चव्हाण, शशी चोपडे, नगरसेविका मंजूषा शेळके, अनिता मिश्रा, प्रमिला गीते यांच्यासह शुभांगी किनगे, सुनीता श्रीवास व नीलिमा तिजारे उपस्थित होते.
अधिक वाचा : सत्ताधारी भाजप-शिवसेनेत घमासान, अकोला महापालिकेत सेनेच्या गटनेत्यासह दोन नगरसेवक निलंबित
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola