अमरावती(प्रतिनिधी)- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत संलग्नित असलेली सात महाविद्यालये बंद करण्याबाबतचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे. त्याअनुषंगाने विद्या परिषदेच्या निर्णयानुसार चौकशी समितीने अहवाल प्रशासनाकडे सादर केला आहे. आता 21 फेब्रुवारी रोजी होणा-या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ही सात महाविद्यालये बंद करण्यावर शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.
अमरावती विद्यापीठाचा कारभार अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती जिल्ह्यापर्यंत विस्तारलेला आहे. आजमितीला ३८२ महाविद्यालये संलग्नित आहेत. मात्र, दरवर्षी विद्यार्थी संख्या रोडावत असून, काही अभ्यासक्रम हे कागदोपत्रीच सुरू असल्याची बाब चौकशी समितीच्या निदर्शनास आली. दरम्यान काही संस्थांनी महाविद्यालये बंद करण्यासाठीचा प्रस्ताव स्वत: विद्यापीठाकडे सादर केला होता. या प्रस्तावाची विद्यापीठ प्रशासनाने दखल घेतली. ही महाविद्यालये बंद करण्यासाठी प्रारंभी विद्यापीठाच्या विद्या परिषदेने निर्णय घेतला. त्यानंतर विविध चौकशी समिती गठित करून वस्तुनिष्ठ अहवाल मागविला. या अहवालाच्या आधारे आता सात महाविद्यालये बंद केले जातील. तत्पूर्वी व्यवस्थापन परिषदेत याविषयी निर्णय होणे महत्त्वाचे मानले जात आहे.
ही महाविद्यालये होणार बंद
1. वर्धा – जय महाकाली शिक्षण संस्थाद्वारा संचालित कॉलेज ऑफ मॅनेजमेंट सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी, अकोला
2. वाशिम – अॅड रामकृष्ण राठी विधी महाविद्यालयाचे एल.एल.बी. पाच वर्षीय अभ्यासक्रम
3. अकोला – ज्ञानज्योती शिक्षण संस्थाद्वारा संचालित कुमुदिनी भदे महाविद्यालय, अकोला
4. अकोला शिक्षण संस्थाद्वारा संचालित डी. बी. भदे महाविद्यालय, अकोट
5. विज्ञान (बी.सी.ए.) महाविद्यालय, सांगळुदकर जीन कम्पाऊंड, दर्यापूर
6. सातपुडा शिक्षण संस्थाद्वारा संचालित विज्ञान महाविद्यालय, जळगाव जामोद
7. स्व. ईश्र्वरभाऊ देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय, दिग्रस