अकोला (प्रतिनिधी) : पोटच्या मुलीला दत्तक द्यायचे सांगत, संबंधित दाम्पत्याला ३ लाख रुपयांची मागणी करून मुलीला विकण्याचा प्रयत्न बालकल्याण समितीने सोमवारी सायंकाळी हाणून पाडला. या प्रकरणात बालकल्याण समितीच्या तक्रारीनुसार खदान पोलिसांनी तिघा मायलेकांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
बालकल्याण समितीच्या सदस्य अॅड. सुनीता कपिले यांच्या तक्रारीनुसार दिवाळीच्या दरम्यान न्यू भीम नगरात राहणारे सुनील राऊत व त्याची आई हे बालकल्याण समितीच्या अध्यक्ष पल्लवी कुळकर्णी यांच्याकडे गेले होते. या ठिकाणी त्यांनी आम्हाला दोन मुलींपैकी एक सहा महिन्याच्या चिमुकलीला दत्तक द्यायचे आहे. मुलींचा सांभाळ करण्यास आम्ही सक्षम नसल्याचे त्यांनी सांगितले. पल्लवी कुळकर्णी यांनी त्यांना दत्तक विधानासाठी कायदेशीर प्रक्रिया केल्यानंतर मुलगी दत्तक देता येईल, असे सांगितले; परंतु पल्लवी कुळकर्णी यांना संशय आल्याने त्यांनी बालसंरक्षण समितीसह पोलिसांची मदत घेतली. त्यासाठी बनावट दाम्पत्य उभे करण्यात आले आणि या दाम्पत्याला मूल दत्तक हवे असल्याचा बहाणा करण्यात आला. या दाम्पत्याकडे सुनील राऊत व त्याची आई गेल्यानंतर त्यांनी सहा महिन्यांची मुलगी देण्याची तयारी दर्शविली; परंतु त्यासाठी त्यांनी बनावट दाम्त्याला ३ लाख रुपयांची मागणी केली. या बनावट दाम्पत्याने पैसे देण्याची तयारी दर्शविली. या प्रकारामुळे सुनील राऊत व त्याच्या आईचा हेतू बालकल्याण समितीच्या लक्षात आल्यावर हा मुलगी विकण्याचा गंभीर प्रकार असल्याने, त्यांनी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी सुनील राऊत व त्याच्या आईविरुद्ध बालन्याय अधिनियम ८१ व कलम ५११ नुसार गुन्हा दाखल केला. बालकल्याण समितीच्या सतर्कतेमुळे पोटच्या मुलीला विकण्याचा व मुलगी नको म्हणून तिला दत्तक देण्याचा प्रकार उघडकीस आला. (प्रतिनिधी)
नकोशी मुलीलाही दत्तक देण्याचा प्रयत्न!
सुनील राऊत याचा मोठा भाऊ संतोष राऊत याला आणि त्याच्या पत्नीला मुलगा हवा होता; परंतु मुलगी झाल्यामुळे ती नकोशी झाली. या मुलीचे काय करायचे, म्हणून संतोष राऊत हासुद्धा बालकल्याण समितीच्या अध्यक्ष पल्लवी कुळकर्णी यांना भेटला आणि आम्हाला मुलगा हवा होता; परंतु मुलगी झाली. ही मुलगी आम्हाला नको. म्हणून तिला दत्तक द्यायची आहे, असे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याही विरुद्ध गुन्हा दाखल केला.
दिवाळीपासून आरोपींना मुलीला दत्तक देण्याच्या नावाखाली विकायचे होते; परंतु आम्हाला संशय आल्याने, बालसंरक्षण अधिकारी करुण महंतरे, पोलीस विभागाच्या मदतीने आम्ही बनावट दाम्पत्य तयार केले. त्यांना आरोपी मुलगी दत्तक देण्यास तयार झाले; परंतु त्यासाठी आरोपीच्या आईने त्या दाम्पत्याला ३ लाख रुपयांची मागणी केली. तसेच आरोपीच्या भावाने मुलगी नको म्हणून तिला दत्तक देण्याचा प्रयत्न केला.
– पल्लवी कुळकर्णी, अध्यक्ष
बालकल्याण समिती, अकोला
अधिक वाचा : तरुणीला मध्यप्रदेशात विकणाऱ्या चार जणांना अटक
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola