अकोला (प्रतिनिधी) – पाच वर्षीय चिमुकलीला पाच रुपयांचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या ७६ वर्षीय वृद्धाला जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्ग १ एम. आय. आरलँड यांच्या न्यायालयाने शनिवारी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
अब्दुल अजीज लालमीया देशमुख असे आरोपीचे नाव आहे. चिमुकलीचे आईवडील कामानिमित्त बाहेर असताना आरोपीने चिमुकलीला ९ जानेवारी २०१७ रोजी पाच रुपयांचे आमिष देऊन तिला घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर मुलगी घरी गेल्यानंतर आईला मुलीची अस्वस्थता दिसली, त्यानंतर मुलीवर अत्याचार केल्याचे समजले. अाराेपी अब्दुल अजीज लालमीया देशमुखला जाब विचारण्यासाठी मुलीची आई गेली असता त्याने उलट तिला धमकावले. त्यानंतर मुलीचे वडील कामावरून परतल्यानंतर भांडण नको म्हणून त्यांनी पोलिसांत तक्रार दिली नाही. मात्र मुलीला दुसऱ्या दिवशी त्रास वाढल्याने मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३७६, पोस्को ५,६, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करून या प्रकरणाची चौकशी केली. त्यानंतर पोलिसांनी अाराेपीविरुद्ध दोषारोपत्र दाखल केले. या खटल्याच्या सुनावणी दरम्यान पोलिसांनी नऊ साक्षीदार तपासले. दोन्ही पक्षाचा युक्तीवाद झाल्यानंतर न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत पोस्को अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा व १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिन्याची कैद, कलम ५०४ अन्वये दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त शिक्षा तसेच कलम ५०६ नुसार दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त शिक्षा आरोपीला ठोठावली. या प्रकरणामध्ये सरकार पक्षाच्या वतीने सहायक जिल्हा सरकारी वकील मंगला पांडे यांनी काम पाहिले.
चिमुकली बालवाडीतून आल्यावर खेळत होती अंगणात
या चिमुकलीची आई शेतावर कामासाठी तर वडील चालक असल्यामुळे तेही कामावर गेले होते. चिमुकली दुपारी बालवाडीतून घरी आल्यानंतर आरोपीने तिला आमिष दिले व तिच्यावर अत्याचार केला होता. या घटनेने नागरिक संतप्त झाले होते.
डीएनए अहवाल होता पॉझिटिव्ह
पोलिसांनी आरोपीचे कपडे जप्त केले होते. त्यावरून पोलिसांनी डीएनएसाठी नमुने घेतले व न्यायवैद्यकशास्त्र विभागाकडे पाठवले होते. मात्र डीएनए अहवालही पॉझिटिव्ह आल्याने तो महत्त्वाचा पुरावा ठरला. तपासलेल्या ९ साक्षीदारांपैकी एकही फितूर झाला नाही.
अधिक वाचा : वर्धा येथे कार्यरत असणाऱ्या पि एस आय विरुद्ध अकोल्यात बलात्काराचा गुन्हा दाखल
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola