अकोला (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ८१ कोटी ५५ लाख ५४ हजार ५६० रुपयांची मदत घोषित झाली असून मार्चअखेर पूर्वी ही रक्कम दोन टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे.
जिरायती शेती करणाऱ्यांना प्रति हेक्टर ६ हजार ८०० रुपये तर बागायती शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १८ हजार रुपये मदत दिली जाणार आहे. दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेतच ही रक्कम दिली वितरित होणार असून कमीत कमी मदत एक हजार रुपयांपेक्षा कमी असणार नाही, याचीही काळजी घेण्यास यंत्रणेला सांगण्यात आले आहे.
प्रारंभी अवर्षण आणि त्यानंतर अवेळी पाऊस-गारपीटमुळे यावर्षी अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हाती आलेली पिके गमवावी लागली. परिणामी सर्व शेतकऱ्यांनी दुष्काळी उपाययोजनांसह रोख मदतीचीही मागणी केली होती. त्या मागणीला अनुसरून शासनाने ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे.
या मदतीचा पहिला टप्पा अर्थात ४० कोटी ७७ लाख ७७ हजार २८० रुपये पोहोचले असून त्याचे वाटप लवकरच सुरु होणार आहे. याकरिता वाटपाची रक्कम थेट बँक खात्यात जमा करावी, असे निर्देश असून त्याच्या उपयोगिता प्रमाणापत्रासह लवकरच दुसऱ्या टप्प्याचीही मागणी नोंदवावी, असेही शासनाच्या आदेशात म्हटले आहे.
जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी, तेल्हारा, बाळापूर व मूर्तिजापूर या पाच तालुक्यातील काही लाख हेक्टरवरील शेती पिके नष्ट झाली आहेत. त्यापैकी ३ लाख १७ हजार २८४ हेक्टर क्षेत्रातील शेती पिके ही ३३ टक्क्यांपेक्षा अधिकच्या निकषात बसत असल्याने १ लाख ७१ हजार ९७३ जिरायती आणि २२ हजार ८०१ बागायती शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने या संपूर्ण बाबींची जुळवाजुळव सुरु केली असून शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच रकमा जमा होतील, अशी तयारीही सुरु केली आहे.
अधिक वाचा : नियोजन भवनात शेतकऱ्यांना मत्स्य् शेतीबाबत मार्गदर्शन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola