कर्णधार विराट कोहलीचे धडाकेबाज शतक (१०४ धावा) आणि महेंद्रसिंह धोनीच्या (५५ धावा) अर्धशतकी खेळीमुळे टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा ४ चेंडू व ६ विकेट राखून विजय मिळवला.
फलंदाजीस पोषक असलेल्या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा घेतलेला निर्णय ऑस्ट्रेलियाला लाभदायक ठरला नाही. शॉन मार्शचे (१३१ धावा) शतक वाया गेले. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली. अखेरच्या षटकात ७ धावांची गरज होती. धोनीने पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला आणि नंतरच्या चेंडूवर एकेरी धाव घेत संघाला विजय मिळवून दिला. तीन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने दुसरा सामना जिंकून बरोबरी साधली आहे. पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. त्यामुळे कसोटी मालिकेसह एकदिवसीय मालिका जिंकण्याचे टीम इंडियाचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, विराट कोहलीला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
ऑस्ट्रेलियाचे २८८ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या टीम इंडियाच्या शिखर धवन आणि रोहित शर्मा जोडगळीने आक्रमक सुरूवात केली होती. रोहितपेक्षा शिखर आक्रमक होता. परंतु, चेंडू फटकवण्याच्या नादात धवन ३२ धावांवर बाद झाला. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या विराटबरोबर रोहितची जोडी चांगली जमली होती. रोहितही फटके मारण्याच्या नादात ४३ धावांवर बाद झाला. अंबाती रायडूनेही बऱ्यापैकी फलंदाजी केली. त्याने २४ धावा केल्या.
विराटने महेंद्रसिंह धोनीला हाताशी घेत आक्रमक पवित्रा घेतला. त्याने आपल्या कारकीर्दीती ३९ वे तर ऑस्ट्रेलियाविरूद्धचे सहावे शतक पूर्ण केले. त्याने आपल्या खेळीत ५ चौकार व २ षटकार लगावले. तो खेळपट्टीवर असेपर्यंत धोनीने दुय्यम भूमिका स्वीकारली होती. शतकानंतर कोहली लगेचच बाद झाला. त्यानंतर धोनीने आपला पवित्रा बदलला. त्याने दिनेश कार्तिकच्या साहाय्याने धावांचा यशस्वी पाठलाग केला. ऑस्ट्रेलियाकडून बेहरेनड्रॉफ, रिचर्ड्सन, स्टॉयनिस आणि मॅक्सवेल यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
तत्पूर्वी, शतकवीर शॉन मार्श (१३१ धावा), ग्लेन मॅक्सवेलच्या (४८ धावा) आक्रमक फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने निर्धारित ५० षटकात टीम इंडियाला २९९ धावांचे आव्हान दिले. ऑस्ट्रेलियाने ९ बाद २९८ धावा केल्या. नॅथन लायनने भुवनेश्वर कुमारच्या अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकला. टीम इंडियाकडून भुवनेश्वर कुमारने १० षटकांत ४५ धावा देत ४ बळी टिपले. त्याला मोहम्मद शमीने ३ बळी घेत चांगली साथ दिली. रवींद्र जडेजाला एक गडी बाद करता आला. कुलदीप यादव आणि आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजला आपला प्रभाव पाडता आला नाही.
अधिक वाचा : हार्दिक पांड्या, लोकेश राहुलवर २ वन-डे सामन्यांची बंदीची शक्यता
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola