अकोला- मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणानंतर आता मुस्लिम समुदायही या मागणीवर आक्रमक झाला आहे. या आक्रमकतेचा पहिला बांध आज, गुरुवारी येथील जिल्हा कचेरीवर फुटला. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एमआयएम) आणि भारिप-बमसंने काढलेल्या मोर्चातून ही आक्रमकता दिसून आली.
राजकीय युतीसाठी एमआयएमला सोबत घेणारे भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी या मोर्चाला संबोधित केले. दुपारी तीनच्या सुमारास अकोला क्रिकेट क्लबच्या (एसीसी) मैदानातून मोर्चा निघाला. ऑल इंडिया एमआयएम आणि भारिप-बमसंचे पदाधिकारी यांच्या नेतृत्वात निघालेला हा मोर्चा पुढे महात्मा गांधी रोड मार्गे जिल्हाकचेरीवर पोहोचला. खबरदारीचा उपाय म्हणून या मोर्चाला जिल्हा परिषदेच्या डाव्या बाजूने एक फर्लांग अंतरावरच अडवण्यात आले होते.
मोर्चाच्या शेवटी एका प्रतिनिधी मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना मुख्यमंत्र्यांच्या नावे लिहिलेले निवेदन सादर केले. यामध्ये आरक्षणासोबतच मुस्लिम समाजाची जनगणना, मौलाना अबुल कलाम आझाद आर्थिक विकास महामंडळासाठी भरीव आर्थिक तरतूद, मुस्लिम समाजाच्या ‘शरीयत’मध्ये राजकीय हस्तक्षेपावर बंदी, अल्पसंख्याकबहुल वस्त्यांचा जलदगतीने विकास आदी मुद्द्यांचाही समावेश आहे. भारिप-बमसंचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, महासचिव युसुफभाई पिंजानी, जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, एमआयएमचे अकोट तालुकाध्यक्ष अब्दुल सादीक इनामदार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जमीरउल्लाखान पठाण, सिरसोलीचे माजी सरपंच इरफानअली मीरसाहेब, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. रहेमान खान, मो. मुस्तफा मो. युसूफ, सय्यद मोहसीन सय्यद अख्तर, अन्सार खान अताउल्ला खान, शेख साबीर शेख मुसा, भारिप-बमसंचे राजेंद्र पातोंड, अॅड. संतोष रहाटे, विकास सदांशिव या पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
देशभरातील मुसलमानांचा आतापर्यंत केवळ वापर झाला, असे निरीक्षण नोंदवत अॅड. आंबेडकरांनी मुसलमानांच्या आजच्या संघटितपणाचे कौतुक केले. ते म्हणाले, तुमचा वापर करणाऱ्या काँग्रेस पक्षाला तुमची मते हवी आहेत, परंतु तुम्ही नको. म्हणूनच माझ्यासोबत युती करताना ते एमआयएमला बाजूला ठेवा, अशी गळ घालतात. परंतु मी ते कदापिही मान्य करणार नाही. मी हवा असेल तर एमआयएमही सोबत असेलच, असे मी त्यांना खडसावून सांगितले आहे. मुस्लिमांच्या आरक्षणासाठी आतापर्यंत जेवढी आंदोलने झालीत, ती धार्मिक बॅनरखाली झाली होती. आज पहिल्यांदा हा लढा एका राजकीय पक्षाच्या नावाने पुढे रेटला जात आहे. त्यामुळे आजपासून खरी राजकीय लढाई सुरु झाली आहे. ही लढाई भविष्यातही अशीच सुरु राहील, या अपेक्षेसह अॅड. आंबेडकर यांनी आपल्या संबोधनाला विराम दिला.
अधिक वाचा : शेतक-यांनी गटशेतीकडे वळावे -पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे आवाहन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola