अकोला – जनसामान्यांच्या आरोग्यासाठी दि. 30 व 31 डिसेंबर 2018 रोजी अकोला शहरात महा आरोग्य अभियानाचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग यांच्यावतीने होणाऱ्या या अभियानाच्या यशस्वीतेसाठी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारी आढावा बैठक घेण्यात आली.
जिल्हाधिकारी यांच्या दालनात सोमवारी झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, शासकीय वैदयकीय महाविदलयाचे उपअधिष्ठाता डॉ. घोरपडे, आरोग्य उपसंचालक डॉ. फारुखी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राठोड, आयएमएचे डॉ. नरेश बजाज, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे विभागीय व्यवस्थापक डॉ. सुनिल वाठोरे, वैदयकीय अधीक्षक डॉ. सिरसाम, डॉ. अश्विनी खडसे हे उपस्थित होते.
अकोला शहरातील लालबहादुर शास्त्री स्टेडियमवर महाआरोग्य अभियान आयोजित करण्यात येणार आहे. या अभियानात जिल्हयातील रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. अभियान यशस्वीतेसाठी बैठकीत पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी विविध सूचना दिल्या. विविध कामांसाठी वेगवेगळया टिम नियुक्त करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
या अभियानात सरकारीसह विविध खाजगी रुग्णालयांच्या तज्ञ डॉक्टरांचे सहकार्य घेतले जाणार आहे. तसेच शासकीय वैदयकीय महाविदयालयाचे विदयार्थी, विविध नर्सिंग कॉलेजचे विदयार्थी व विदयार्थीनी यांचासुध्दा अभियानात सहभाग राहणार आहे. एक्स रे, सोनोग्राफी, विविध चाचण्यांसाठी पॅथोलॉजीची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. एमआरआयसुध्दा काढुन दिला जाणार आहे. रुग्णांसाठी औषधीही उपलब्ध करुन दिली जाणार आहेत.
अभियानात विविध आजारांसाठी साधारण 30 बाहयरुग्ण स्टॉल राहणार आहेत. नोंदणीसाठी स्वतंत्र कक्ष राहणार आहे. सर्व प्रकारच्या तपासण्या अभियानात केल्या जाणार आहेत. या सर्व कामांसाठी टीमची नियुक्ती करावी. नोडल अधिकाऱ्याची नेमणुक करावी. तसेच परस्परांमध्ये समन्वय ठेवून जनसामन्यांना सुलभपणे आरोग्यसुविधा उपलब्ध करुन दयाव्यात, अशी सूचना पालकमंत्री यांनी दिली. या अभियानाची जास्तीत प्रचार-प्रसिध्दी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
दरम्यान, अभियानापूर्वी तालुक्यांतील प्राथमिक आरोग्य केंद्रांत रुग्णांची प्राथमिक तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर या रुग्णांची पुढील तपासणी महाआरोग्य अभियानात केली जाईल. अभियानात गंभीर आजाराचे निदान झाल्यास रुग्णांवर पुढील उपचारही केले जाणार आहेत.
रुग्णांच्या सुविधेसाठी सुरु करण्यात आलेली आयुष्यमान भारत योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजनेबाबत जनजागृती होण्यासाठी या दोन्ही योजनांचे स्टॉल या अभियानात लावले जाणार आहेत. लाभार्थ्यांना या योजनेत सहभागी करुन घेण्यासाठी स्टॉलवर सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. तसेच आयुष्यमान भारत योजनेचे गोल्डन कार्डचे वाटप अभियान काळात केले जाणार आहे, या महाआरोग्य अभियानाचा जनतेने लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री यांनी केले आहे.
अधिक वाचा : पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या जनता तक्रार निवारण सभेला उत्स्फुर्त प्रतिसाद
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola