वाशिम : देशातील संपूर्ण बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी आणखी १०० कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल. तसेच बंजारा समाजाची संस्कृती जपण्यासाठी बंजारा अकादमी स्थापण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोहरादेवी येथे केली.
आज पोहरादेवी विकास आराखड्यातील ‘नंगारा’रुपी वस्तुसंग्रहालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संत रामराव महाराज, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री संजय राठोड, सहपालकमंत्री मदन येरावार, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, खासदार सर्वश्री संजय धोत्रे, भावना गवळी, प्रतापराव जाधव, आमदार सर्वश्री हरिभाऊ राठोड, गोपीकिशन बाजोरिया, श्रीकांत देशपांडे, मनोहर नाईक, प्रदीप नाईक, अॅड. निलय नाईक, राजेंद्र पाटणी, लखन मालिक, डॉ. अशोक उईके, राजू तोडसाम, कर्नाटकचे आमदार प्रभू चव्हाण, रेवू नाईक, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष हर्षदा देशमुख, यवतमाळ जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे, परभणी जिल्हा परिषद अध्यक्ष उर्मिला राठोड, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, सेवालाल महाराज यांनी समाजाला दिशा देण्यासोबतच लढवय्येपणाची शिकवण दिली. संपूर्ण बंजारा समाजाला परिवार मानून त्यांनी अन्याय करणाऱ्या परकियांविरुद्ध संघर्ष केला. ब्रिटीशांविरूद्ध पहिला एल्गार त्यांनी पुकारला. अशा महान व्यक्तीच्या समाधीस्थळाचा विकास करणे ही राज्य शासनाची अग्रकमाची जबाबदारी आहे. सेवालाल महाराजांची जयंती आता शासन स्तरावर साजरी करण्यात येत आहे. त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव होण्यासाठी हे जागतिक दर्जाचे स्मारक असेल. या स्मारकासाठी २५ कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. उर्वरित १०० कोटी रुपयांचा निधीसुद्धा लवकरच उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच पोहरादेवीच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
बंजारा समाजाची संस्कृती जपण्यासाठी बंजारा अकादमी स्थापन करण्यात येईल. जिल्ह्यातील विविध महामार्गांसोबतच पोहरादेवी येथून समृद्धी महामार्ग जाणार आहे. त्यासोबतच वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गावर पोहरादेवी येथे स्थानक देण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे आणि रस्ते मार्गाने पोहरादेवी जोडल्या जाणार आहे. त्यामुळे पर्यटकांसह भाविकांना येथे येण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
बंजारा समाजाच्या आश्रमशाळांना संहिता तयार करून देण्यात आली आहे. त्यासोबतच परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येतील. तांडा वस्ती सुधारण्यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करण्यात येईल. त्यामुळे बंजारा समाजाचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. बंजारा समाजाच्या मागणीप्रमाणे इदाते आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. बंजारा समाजाच्या कलाकुसरीच्या दागिन्यांनी परदेशी पर्यटकांना देखील भुरळ घातली आहे. बंजारा कलेला वाव देण्यासाठी याठिकाणी बंजारा क्लस्टर तयार करण्यात येईल. या माध्यमातून उत्पादित वस्तूंना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
सेवालाल महाराजांनी पाणी काटकसरीने वापरण्याचा संस्कार केला होता. पाण्याच्या बाबतीत त्यांची भूमिका सरकार जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून पुढे नेत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola