अकोला- नाशिकची द्राक्षे, जळगावची केळी, नागपुरची संत्री अशाप्रकारे फळमहात्म्याचे विशेषण लागलेल्या शहरांच्या यादीत आता अकोल्याचाही समावेश होणार असल्याची खात्री निर्माण झाली आहे. या शहरातून केळी, मिरची आणि भेंडीची निर्यात सुरु झाली असून या फळ व भाजीपाल्याने आखाती देशाला अक्षरश: वेड लावले आहे. जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारामुळे हे शक्य झाले अाहे. आतापर्यंत ३८० टन केळी, २२ टन मिरची व सात टन भेंडीची निर्यात करण्यात आली आहे. या नव्या प्रयोगामुळे जिल्ह्याच्या अकोट व तेल्हारा तालुक्यांतील शेतकऱ्यांनाही निर्यातक्षम फळे व भाजीपाला उत्पादन करण्याची सवय जडली असून त्यांच्या उत्पादनात बऱ्यापैकी वाढ झाली आहे. खारपाणपट्टा असल्यामुळे अकोला जिल्ह्यात शेती पिकांचे फारसे उत्पादन होत नाही. अशा परिस्थितीत निर्यातक्षम भाजीपाला व फळांचे उत्पादन सुरु झाल्याने अकोट व तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये जगण्याची नवी उमेद निर्माण झाली आहे. अमानकर यांचे पाठबळ व प्रयोगक्षम मार्गदर्शनामुळे वाडेगाव परिसरातील शेती यासाठी ‘एक्स्पोर्ट सेंटर’ बनले अाहे. या ठिकाणाहून दर आठवड्याला केळी व मिरचीची निर्यात केली जात आहे. संदीप इंगळे, राजदत्त मानकर आदी तरुण शेतकरी त्यासाठी अधिक मेहनत घेत आहेत.
निर्यातक्षम दर्जाचे शेती उत्पादन हा अकोलाच नव्हे तर पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यांसाठीचा पहिलाच प्रयोग आहे. याआधी बहुदा कोणत्याही जिल्ह्यातून भाजीपाला किंवा फळांची निर्यात झाली नाही. त्यामुळे अकोल्याची शेती पाहण्यासाठी इतर जिल्ह्यातील शेतकरी मित्रांनीही या शहराकडे धाव घेतली आहे.
मग्रारोहयोचे उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर यांच्या संकल्पनेमुळे हा उपक्रम जिल्ह्यात रूजू झाला असून त्याचे कौतुक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केले आहे. अलीकडेच घेण्यात आलेल्या जिल्हा आढावा बैठकीच्यावेळी ही माहिती त्यांना देण्यात आली. ती ऐकल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola