हिंगोली : – संपूर्ण राज्यात गाजलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या हिंगोली पोलीस भरती घोटाळ्यामध्ये एसआरपीचे तत्कालीन समादेश आणि हिंगोलीचे माजी अपर पोलीस अधीक्षक नामदेव मिठ्ठेवाड यांना पोलिसांनी अटक केली आहे. नामदेव मिठ्ठेवाड यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
हिंगोली येथील राज्य राखीव पोलीस भरतीमध्ये घोटाळा झाला होता. या घोटाळ्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यात आला होता. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या चौकशीत राज्य पोलीस दल गट क्र. १२ च्या पोलीस भरतीमध्ये घोटाळा झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर दि. ११ मे २०१८ रोजी हिंगोली शहर पोलीस ठाण्यामध्ये तत्कालीन सहाय्यक समादेशक जयराम फुपाटे, सुत्रधार पोलीस चालक नामदेव ढाकणे, एस.एस.जी. सॉफ्टवेअर कंपनीचे ऑपरेटर शिरीष औधूत, पोलीस कर्मचारी शेख महेबुब शेख आगा यांच्यासह गुण वाढवून नोकरी मिळविणाऱ्या २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक राहुल मदणे यांच्यासह पथकाकडे होता. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींनी सन २०१३ मध्ये ४, २०१४ मध्ये १० तर सन २०१७ मध्ये ६ अशा एकूण २० जणांचे गुण वाढवुन त्यांची एसआरपीत भरती करण्यता आली.
दरम्यान, तपास अधिकारी तथा पोलीस उप अधीक्षक राहुल मदणे यांनी चौकशीसाठी एसआरपीचे तत्कालीन समादेशक तथा हिंगोलीचे माजी अप्पर पोलीस अधीक्षक नामेदव मिठ्ठेवाड यांना आज बोलाविले होते. अर्थपुर्ण देवाणघेवाणीतुन मर्जीत उमदेवारांचे चांगभले करण्यासाठी दिलेली उत्तर पत्रिका व संगणकातील बाबी उघड झाल्यानंतर डिवायएसपी मदणे यांनी मिठ्ठेवाड यांना अटक केली. यानंतर सायंकाळी 5 वाजता हिंगोली येथील न्यायालयाच्या न्यायासनासमोर मिठ्ठेवाड यांना हजर केल्यावर पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाल्याचे मदणे यांनी सांगितले.
अधिक वाचा : राज्यात २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबरदरम्यान संविधान सप्ताह – राजकुमार बडोले