अकोला (प्रतिनिधी) : बाखराबाद येथील एकाच परिवारातील चौघांच्या सामूहिक हत्याकांडप्रकरणी शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. केदार यांच्या न्यायालयाने आरोपी असलेल्यागजानन वासुदेव माळी, नंदेश गजानन माळी व दीपक गजानन माळी या बापलेकांना फाशीची शिक्षा सुनावली. या प्रकरणात आरोपींना १४ नोव्हेंबर रोजी दोषी ठरविले होते.
उरळ पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बाखराबाद येथे १४ एप्रिल २०१४ रोजी २ एकर शेतजमिनीच्या वादातून आरोपी गजानन वासुदेव माळी व त्यांची दोन मुले नंदेश गजानन माळी व दीपक गजानन माळी यांनी विश्वनाथ माळी, वनमाला माळी, योगेश माळी व राजेश माळी यांच्यावर धारधार शस्त्रांनी हल्ला चढवित त्यांची हत्या केली होती. अकोला पोलिसांनी तीनही आरोपी असलेल्या गजानन वासुदेव माळी, नंदेश गजानन माळी व दीपक गजानन माळी यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२, ४५२, १२० (ब) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते. उरळ पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. या खटल्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. केदार यांच्या न्यायालयात झाल्यानंतर त्यांच्या न्यायालयाने तीनही आरोपींना ३०२ आणि २०१ अन्वये दोषी ठरविले. त्यानंतर आरोपींचे कृत्य राक्षसापेक्षा भयंकर असल्याने तसेच एका झाडाच्या फांद्या तोडाव्या त्याप्रमाणे चौघांची हत्या केल्याने न्यायालयाने तीनही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. यासोबतच दंडही ठोठावला असून, सरकार पक्षाच्यावतीने अॅड. गिरीष देशपांडे यांनी कामकाज पाहिले.
दोन एकर शेतीत कुटुंबाचा सत्यानाश
राजेश व योगेशचे वडील भगवंतराव माळी यांनी आरोपी गजानन माळी यांच्याकडून दोन एकर शेती खरेदीचा व्यवहार केला होता; मात्र गजाननने व्यवहार योग्य नसल्याचे कारण समोर करून व्यवहार करण्यास नकार दिला. त्यामुळे भगवंतराव यांनी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केल्यानंतर न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला होता. त्यानंतर शेतीचा ताबा व अन्य कारणांमुळे चौघांचे हत्याकांड घडले अन् तीन कुटुंबाचा सत्यानाश झाल्याची चर्चा होती.
कडबा कटरच्या पात्याने हल्ला
योगेश माळी व त्यांची चुलत बहीण वनमाला रोकडे हे १४ एप्रिल २०१४ रोजी सायंकाळी शेतात असताना त्यांच्यावर गजानन माळी, नंदेश व दीपक या तिघांनी कडबा कटरचे पाते व कुºहाड घेऊन हल्ला चढविला होता, त्यानंतर राजेश माळी व त्यांचे काका विश्वनाथ माळी हे घरी असताना त्यांच्या घरी जाऊन या दोघांवर हल्ला चढविला. यामध्ये चारही जणांचा जागेवरच मृत्यू झाला होता.