अकोला (शब्बीर खान): हिंगणा म्हैसपूर येथून रेतीची अवैधरीत्या वाहतूक करीत असलेले पाच ट्रक अकोला पोलिसांनी पकडले असून, ते खदान पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात आले आहेत. रेती माफियांचा प्रचंड धुडगूस सुरू असून, मध्य प्रदेशातून आलेला एक ट्रकही सिव्हिल लाइन पोलिसांनी जप्त केला आहे. बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील हिंगणा व म्हैसपूर येथील नदी पात्रातील मध्यरात्री अवैधरीत्या वाळूचे उत्खनन करण्यात येऊन त्यांची चोरट्या मार्गाने वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती गावातील ग्रामस्थांना मिळाली. त्यावरून त्यांनी त्या ठिकाणी जाऊन संबंधित चारही टिप्पर ताब्यात घेतले. यावेळी त्या ठिकाणी हाणामारीसुद्धा झाल्याची घटना घडली. नंतर शंभर क्रमांकावर यासंदर्भातील माहिती ग्रामस्थांनी पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. सदर कार्यक्षेत्र हे बाळापूर पोलिसांच्या हद्दीमध्ये येत असल्याने नियंत्रण कक्षाच्या पोलिसांनी ही माहिती बाळापूर पोलिसांना दिली. त्यानंतर चारही टिप्पर पोलिसांनी ताब्यात घेऊन ते खदान पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये जमा केले आहेत. या वाळूच्या अवैध उत्खननाची माहिती महसूल प्रशासनाला दिली असून, शनिवारी यावर दंडात्मक कारवाई करण्यात येऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यात येणार आहे. दरम्यान,मध्य प्रदेशातून विनारॉयल्टी वाळूची वाहतूक करणाऱ्या एक ट्रकला सिव्हिल लाइन पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली. यावर महसूल विभागाच्यावतीने कारवाई करण्यात येणार आहे. रेती माफियांचा हैदोस वाढला! म्हैसांग, आपातापा, कट्यार, कपिलेश्वर या परिसरासह हिंगणा म्हैसपूर, तेल्हारा व बाळापूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी करण्यात येत असून, अवैधरीत्या वाहतूक करण्यात येत असल्याचे वास्तव आहे. याकडे महसूल प्रशासनाची डोळेझाक होत असल्याने ग्रामस्थ पोलिसांना माहिती देत आहेत. पोलिसांनी विविध ठिकाणांवर कारवाई करीत अशा प्रकारे रेतीची वाहतूक व चोरी करणारे ट्रक जप्त केले आहे.