अकोला – मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षीत क्षेत्रातील अकोट तालुक्यातील केलपाणी बु. आणि केलपाणी या गावांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अनोखी भेट मिळाली आहे. अधिवासी क्षेत्रात येणाऱ्या या दोन्ही गावांना महसुली दर्जा देण्यात आला असून या गावांमध्ये लवकरच नवीन ग्रामपंचायत स्थापन होणार आहे. यामुळे केलपाणी बु. आणि केलपाणीमध्ये विकास कामांना वेग येणार आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षीत क्षेत्रात असलेली केलपाणी बु. आणि केलपाणी ही गावे अकोट तालुक्यात पुनर्वसित करण्यात आली आहेत. या गावांचा विकास होण्यासाठी या गावांना महसुली दर्जा मिळावा आणि येथे नवीन ग्रामपंचायत स्थापन व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती, त्यानुसार जिल्हा परिषदेच्या आमसभेत ठरावही घेण्यात आला होता. याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर केल्यानंतर स्वत: मुख्यमंत्री यांनी याची तातडीने दखल घेत केलपाणी बु. आणि केलपाणी या गावांना महसुली दर्जा देण्याबाबतच्या सूचना दिल्या.
दरम्यान, ग्रामविकास मंत्रालयाने सदर गावांना महसुली दर्जा देण्याबाबतची अधिसूचना जारी केली असून त्यानुसार केलपाणी बु. आणि केलपाणी गावांना महसुली दर्जा प्राप्त झाला आहे. लवकरच या गावांमध्ये नवीन ग्रामपंचायत स्थापन होणार असून शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून गावाच्या विकासाला वेग येणार आहे. या गावांमध्ये ग्रामपंचायतची नवीन इमारत स्थापन होण्याबरोबरच शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र आदी सुविधा उपलब्ध होणार आहेत.
सदर पुर्नवसित गावांचा जलदगतीने सर्वांगिण विकास व्हावा, यासाठी शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ, केम प्रोजेक्ट व VSTF या योजन अंतर्गत या पुर्नवसन झालेल्या गावांतील बांधवांना त्यांच्या उपजीविकेकरिता रोजगाराची साधने तातडीने उपलब्ध करुन देण्याबाबत जिल्हाधिकारी अकोला यांनी नियोजन करावे अशा सूचना मुख्यमंत्री महोदय यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहे. दरम्यान, महसुली दर्जा मिळाल्याने केलपाणी बु. आणि केलपाणी या गावांचा झपाटयाने विकास होणार असून ग्रामस्थांना मिळालेल्या या अनोख्या भेटीमुळे विकासाचे गावात नवे पर्व सुरु होणार आहे.
अधिक वाचा : भारिप बमसं अकोट तालुकाच्या वतीने बिरसा मुंडा यांची जयंती साजरी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola