अकोला (प्रतिनिधी): प्रबोधनाचे विचार व कृतिशील संवेदना समाजात रुजविण्याचे मोठे काम जिल्ह्यासह संपूर्ण वऱ्हाडात उभे करणाऱ्या युवाराष्ट्र च्या लक्ष्मीमुक्ती या पहिल्या दिवाळी अंकाचे प्रकाशन काल स्थानीक रचना कॉलनी स्थित अभियंता भवन येथे उत्साहात पार पडले.
नारी शक्तीच्या जागरणातून स्त्री पुरुष मुक्ती चा संदेश देणारा हा युवाराष्ट्र या सामाजीक संघटनेचा पहिला अंक आहे.
प्रबोधनाचे विचार समाजात रुजवण्या सोबतच जिल्ह्यात वाढत असलेल्या माता,बाल कुपोषणासारख्या समस्येचे योग्य निदान ही समस्या मिटवण्यासाठी ठोस उपाय युवाराष्ट्र आपले पुढचे कार्य म्हणून हाती घेणार आहे.
दिवाळी अंकातून उभा होणारा निधी कुपोषणमुक्ती साठी वापरला जाणार असल्याचे काल संपन्न झालेल्या प्रकाशन सोहळ्यात बोलतांना युवाराष्ट्र चे अध्यक्ष डॉ.निलेश पाटील यांनी सांगितले.
राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या डॉ.आशाताई मिरगे,ओझोन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे संचालक व शिवसेना वैद्यकीय आघाडी चे जिल्हाध्यक्ष डॉ.विनीत हिंगणकर यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न झाले.प्रमुख अतिथी म्हणून अस्थीरोग तज्ञ डॉ. अमोल रावणकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जिल्हाअध्यक्ष श्रीकांत पिसे पाटील,एम,एस.ई. बी.अभियंता सह.पत संस्थेचे चेअरमन संतोष खुमकर,अनिस च्या डॉ. स्वप्ना लांडे साकरकर,शेतकरी संघटना तथा युवाराष्ट्र चे विलास ताथोड,धनंजय मिश्रा,अविनाश नाकट,आदी उपस्थीत होते.
प्रामुख्याने ग्रामीण व कृषी क्षेत्रांत काम करणाऱ्या युवाराष्ट्र ने समाजातील युवाशक्तीला राष्ट्रा समोरील आव्हानांबाबत चिंतनाशी जोडण्याचा विचार व कृतिशील आचरणाचा पायंडा गेल्या तीन,साडेतीन वर्षांत पाडुन दिला आहे.भारत आजही बहुसंख्येने खेड्यांमध्ये वसलेला देश आहे व कृषी ही आपली मुख्य ओळख आहे. म्हणून समर्पित व बुद्धिवादी युवाशक्तीला ग्रामीण व कृषी क्षेत्रातील चिंतनाशी जोडण्याचे काम “युवाराष्ट्र” ने केले.वऱ्हाडातील शेकडो गावांपर्यंत युवाराष्ट्र ची किरणे पोहोचली आहेत.सहवेदना हा माणुसकीचा स्थायीभाव म्हणून 258 विधवा भगिनींच्या कुटुंबांना सामाजिक योगदानातून रोजगारांची साधने पुरवणे असो वा 150 पेक्षा अधीक ग्रामीण मातृशक्तीला चतुरंग शेती च्या संकल्पने अंतर्गत रोजगार व बाजारपेठ उपलब्ध करून देणे असो,अडचणींमुळे वाटा अडलेल्या व व्यवस्थेने विपन्नावस्थेत ठेवलेल्या 35 प्रतिभावान मुलांच्या उच्च शिक्षणाचा सामाजीक योगदानातून खर्च उचलणे असो,वऱ्हाडच्या ग्रामीण भागात 10 डिजिटल क्लासरूम्स ची उभारणी असो वा 1000 माता भगिनींची निःशुल्क स्तन व गर्भाशय कर्करोग निदान चाचणी व उपचार असो,की मग 10000 माता भगिनींची निःशुल्क रक्ताल्पता तपासणी व उपचार असो,वृक्ष संवर्धन असो की जलचिंतन,की ग्रामीण भागातील हजारो रुग्णांना उपचारांसाठी मदत असो, शेतकरी पुत्रांसाठी अभ्यासिका असो वा युवा प्रबोधन मेळावे असो युवाराष्ट्र ने प्रत्येक वेळी आपल्या संवेदना कृतीशीलतेतून प्रकट केलेल्या आहेत.यापुढेही आम्ही समाजामध्ये वैचारिक प्रबोधन घडवून आणण्या सोबतच उत्पादक शेतकऱ्यांच्या श्रम,बुद्धी,गुंतवणुकीला व धोका पत्करन्याला प्रतिष्ठा लाभण्याच्या लढ्यात अविरत संघर्षरत राहू असे प्रतिपादन युवाराष्ट्र चे डॉ निलेश पाटील यांनी केले.
युवाराष्ट्र च्या अनेक उपक्रमांत वेळोवेळी सहकार्य करणारे डॉ.विनीत हिंगणकर यांनी या पुढेही युवाराष्ट्र च्या माणुसकीच्या सेवाकार्याला हातभार लावू असे आश्वासन दिले व युवाराष्ट्रच्या पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.डॉ.आशाताई मिरगे यांनी युवाराष्ट्र ने महिलांचे प्रश्न अधीक व्यापकपणे हाती घ्यावेत,आम्ही सोबत राहु असे प्रतिपादीत केले.डॉ.अमोल रावणकर,श्रीकांत पिसे पाटील, डॉ. स्वप्ना लांडे साकरकर,युवा साहित्यीक यांचीही या प्रसंगी बहारदार उद्बोधक भाषणे झालीत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय मिश्रा यांनी तर आभार प्रदर्शन अविनाश नाकट यांनी केले.
आज वऱ्हाडामध्ये एकीकडे उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतामालाची माती होत आहे तर त्याचवेळी दुसरीकडे कुपोषणा मुळे माता,अर्भक व बालमृत्यू च्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.या अनास्थेच्या भूकबळी साठी व उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थीक स्वातंत्र्यासाठी व देशातील 60 कोटी युवकांच्या हातांना व मेंदूंना काम मिळण्यासाठी कृतिशील वैचारीक दीप बनून तेवत राहण्यासाठी युवाराष्ट्र कटिबद्ध असेल सहृदयी नागरिकांनी आम्हाला या कामी साथ द्यावी असे आवाहन युवाराष्ट्र तर्फे करण्यात येत आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिनेश लोहोकार,शिवराज पाटील, मनोहर खाडे, विठ्ठल खाडे यांनी परिश्रम घेतले.युवाराष्ट्र वर प्रेम करणारे नागरिक कार्यक्रमाला मोठया संख्येने उपस्थित होते.