अकोला (योगेश नायकवाडे) : शासन व प्रशासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे. पणन कार्यालयाकडे अनेक मागण्या प्रलंबित असून पंधरा दिवसात मागण्या मान्य न झाल्यास जिल्हा पणन कार्यालय जाळून टाकणार असल्याचा इशारा प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी दिला. यावेळी प्रशासनाच्या वेळकाढूपणाच्या धोरणाविरुद्ध आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक्काम मोर्चा काढत बैलगाडी जाळून निषेध केला.
निसर्गाची अवकृपा आणि शासन, प्रशासनाच्या वेळकाढूपणाच्या धोरणांमुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे. विदर्भातील दुष्काळग्रस्त जाहीर केलेल्या तालुक्याच्या यादीतुन सुटलेल्या सर्व तालुक्यांचे पुनःसर्वेक्षण करून सर्व तालुके दुष्काळग्रस्त घोषीत करावे, महाराष्ट्रामध्ये मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर भाषांतर योजना सुरू करण्यात यावी, बोंडअळी पीक विम्याचे थकीत अनुदान त्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे, नाफेडमार्फत खरेदी केलेल्या तुर, हरभरा, मुग, उडीदाचे पैसे त्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावे, मेळघाटमधील पुर्नवासितांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करून आदिवासी बांधवांना वनपट्टे तातडीने वाटप करावे, शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागु करावी आदी मागण्यासाठी आमदार कडू यांच्या नेतृत्वाखाली येथील स्वराज्य भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडीतून मुक्काम मोर्चा काढण्यात आला. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर, प्रहार युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश पाटील यांच्यासह प्रहार संघटनेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने निकाली काढण्याची मागणी रेटून धरली.
पणन कार्यालयाकडून शेतकऱ्यांसंदर्भात वारंवार अडवणुकीचे धोरण स्वीकारले जात असून अनेक मागण्या प्रलंबीत आहेत. ह्या मागण्या पंधरा दिवसात मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलन करून पणन कार्यालय जाळून टाकण्याचा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला. यावेळी शासन व प्रशासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांचा बैलबंडी जाळून निषेध करण्यात आला. या आंदोलनात प्रहार संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola