अकोला – नागपूरहून अकोल्यात चोरट्या मार्गाने येणारा राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा अखेर पोलिसांनी २५ किमी. पाठलाग करून पकडला. यावेळी वाहनचालकाने पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांच्या अंगावर वाहन घातले. सुदैवाने पोलिसांना कोणतीही इजा झाली नाही. चोर-पोलिसांचा हा थरार गुरुवारी सकाळी ११ वाजता राष्ट्रीय महामार्गावरील बाभुळगाव ते बाळापूर दरम्यान घडला. या घटनेवरून गुटखा माफियांची दादागिरी किती वाढली हे दिसून येते.
शहरातील गुटख्याच्या व्यवसायात बुडालेल्या माफियांवर पोलिसांची करडी नजर आहे. या माफियांनी अकोल्यासाठी गुटखा वाहनात भरला की, खबऱ्यांकडून पोलिसांना माहिती मिळते. त्यानुसार पोलिस सापळा रचतात. पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक हर्षराज अळसपुरे यांना गोपनीय माहिती मिळाली की, नागपूरहून अकोल्यात गुटखा येत आहे. त्यानुसार त्यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर बाभुळगाव नजीक सापळा रचला. गुटख्याने भरलेले बोलेरो पिकअप एमएच ३० बीडी १०२८ हे वाहन येताच क्षणी ८ पोलिसांच्या पथकाने वाहनचालकाला थांबवण्याचा इशारा केला; मात्र वाहनचालकाने थेट पोलिस अधिकारी व ३ कर्मचाऱ्यांच्या अंगावर वाहन घातले. पोलिसांनी समयसूचकता दाखवल्याने ते बालंबाल वाचले व सुसाट वाहन बाळापूरच्या दिशेने निघाले. पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरु केला. कधी पोलिस ओव्हरटेक करीत तर कधी गुटख्याचे वाहन. अखेर पोलिसांनी बाळापूर महामार्ग पोलिसांना नाकाबंदी करण्याचे सांगितले.
बाळापूर येथे नाकाबंदी लागलेली पाहताच गुटख्याचे वाहन पुन्हा अकोल्याच्या दिशेने वळले. पोलिस आपल्या मागेच असल्याने आता आपले काही खरे नाही, म्हणून गुटखा वाहनचालकाने वाहन एका शेतात घातले व वाहनचालक व त्याचा सोबती दोघे शेतात पळू लागले. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडलेच. तब्बल पाऊण तास चोर- पोलिसांचा हा खेळ गुरुवारी सकाळी ११ वाजता सुरु होता. पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी वाहनचालक अब्दुल नईम अब्दुल रफिक व अजमत खान सलाउल्ला खान रा. बाळापूर या दोघांविरुद्ध भादंवी ३०७, ३५३, ३४ नुसार एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
हा गुटखा विनोद नामक माफियाचा असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. तर रामा नामक माफियाचाही त्यात हिस्सा असल्याचे समोर आले आहे. शहरात गुटखा माफियांचे मनोबल एवढे वाढले आहे, की ते आता पोलिसांना उडवायला मागेपुढे पाहत नाहीत. कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या माफियांना पोलिसांनी सळो की पळो करून सोडल्याने त्यांनी गोडाऊनची ठिकाणे बदलली आहेत.
अधिक वाचा : रक्तदान मोहीमेत अमुल्य योगदान दिल्याने आकाश गवई सन्मानित
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola