अकोला – जलसंधारणाच्या कामात भारतीय जैन संघटनेचे काम अत्यंत कौतुकास्पद आहे, सुजलाम सुफलाम अकोला अंतर्गत आपला जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी ही संघटना जलसंधारणाच्या कामाकरीता विनामुल्य मशिन्स उपलब्ध करुन देणार आहे, या संधीचे निश्चितपणे सोने करून अकोला जिल्हा सुजलाम सुफलाम करून दुष्काळ मुक्त करावा, यासाठी व्यवस्थीत नियोजन करून कमीत-कमी वाहतुकीमध्ये जास्तीत-जास्त परिणाम पुर्वक कामे करावीत असे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिले.
अकोला जिल्हा कायम दुष्काळ मुक्त करण्यासाठी सुजलाम सुफलाम अकोला अभियानातंर्गत मृद व जलसंधारण विभाग आणि भारतीय जैन संघटना यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराप्रमाणे जलसंधारण कामे अंमलबजावणीबाबत आज नियोजन भवनात नियोजन व आढावा सभा पार पडली. त्यावेळी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, सुजलाम सुफलाम प्रकल्पाचे राज्य व्यवस्थापक विदयाधर भालेराव, भारतीय जैन संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुभाष गादिया, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. बोके, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता चिनमय वाकोडे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उपजिल्हाधिकारी रोहयो अशोक अमानकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राजेंद्र निकम सह अकोला , अकोट, मुर्तिजापूर, व बाळापूरचे उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, सुजलाम सुफलाम प्रकल्पातंर्गत जिल्हयात 2578 कामे प्रस्तावित आहेत. यापैकी 534 कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली कामे त्वरीत सुरू करावी असे निर्देश त्यांनी संबंधीत यंत्रणेला दिलेत. कामासाठी जेसीबीचा वापर करतांना ज्या गावाच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्या लगतच्या गावातील प्रस्तावित कामांचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवावे यासाठी तालुकास्तरीय समन्वय समितीने नियोजन करावे कमीम कमी मशिनच्या वाहतुकीमध्ये जास्तीत जास्त कामे होतील याकडे कटाक्षाने लक्ष घालवून कामे करावीत असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी संबंधीत यंत्रनेला दिलेत. कोणतीही जेसीबी किंवा , पोकलँड मशीन विनापयोग राहणार नाही याची दक्षता घ्यावी. कृषि विभागाने शासनाच्या महत्वाकांक्षी मागेल त्याला शेततळे या योजनेतंर्गत शेततळे तयार करण्याचे नियोजन करून येत्या सोमवारी होणा-या बैठकीत सादर करावे. अकोला जिल्हयासाठी दिलेले 2200 शेततळयाचे उदिष्ट पुर्ण करावे असेही ते म्हणाले. सुजलाम सुफलाम प्रकल्पातंर्गत करण्यात येणा-या कामात कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेया यांनी दिले. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियानातंर्गत अकोला जिल्हयात अनेक कामे झाली आहेत. परंतु संपूर्ण अकोला जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून सुजलाम सुफलाम अकोला अभियान राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत आगामी 15 जून पर्यंत जलसंधारणाची मोठया प्रमाणात कामे केली जातील. आणि अकोला जिल्हा दुष्काळमुक्त करावा. असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे म्हणाले की, प्रशासन आणि भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून अकोला जिल्हयात केल्या जाणाऱ्या जलसंधारणाच्या कामातून जिल्हयात मोठया प्रमाणात जलसाठे निर्माण होऊन शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. यासाठी गावक-यांशी संपर्क साधुन कोणतेही काम घेणे गरजेचे आहे हे ठरवावे. खोलीकरण करतांना निघणारा गाळ शेतक-यांच्या शेतात विनामुल्य देण्यात येणार आहे. यासाठी गावागावात ग्रामसभेच्या माध्यमातुन ग्रामसेवक व सरपंच यांनी जनजागृती करावी असेही ते म्हणाले. दुष्काळ मुक्त अकोला हे मिशन शासकीय काम न समजता सामाजिक बांधीलकी म्हणून सामाजिक काम समजून सर्व यंत्रणेने समन्वय ठेवून करावे असे ते म्हणाले.
भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलालजी मुथा आपल्या व्हिडीओ संदेशात म्हणाले की, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आणि महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी भारतीय जैन संघटना जलसंधारणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत आहे. बुलडाणा जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसंधारणाच्या कामाकरीता संघटनेने मार्च महिन्यात सुमारे 134 जेसीबी मशिन व पोकलेन उपलब्ध करुन दिले. अवघ्या तीन महिन्यांत या जिल्हयात जलसंधारणाची अनेक कामे झाली. आता अकोला जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी आम्ही मशिन उपलब्ध करुन देणार आहोत. यासाठी प्रशासनाला आमचे संपूर्ण सहकार्य राहिल. सर्वांच्या समन्वयातून अकोला दुष्काळमुक्त केला जाईल, अशी ग्वाही देत जलसंधारणाच्या ज्या कामासाठी मशिनची आवश्यक्ता असेल त्या कामासाठी मशिन उपलब्ध करून देण्यात येतील असे सांगितले.
जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. बोके यांनी अकोला जिल्हयातील प्रस्तावित जलसंधारणाच्या कामांचे सादरीकरण केले. भारतीय जैन संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुभाष गादीया यांनी भारतीय जैन संघटनेच्या जिल्हा व तालुकास्तरीय मॅनेजर ,सुपरवायजर व सर्व तालुका कोआर्डीनेटर यांची ओळख करून दिली. भारतीय जैन संघटनेचे मानद पदाधिकारी हे तालुका समन्वयक समितीशी संपर्क ठेवून सुजलाम सुफलाम अकोला अभियानामध्ये प्रशासनाला मदत करणार आहे. यावेळी सुजलाम सुफलाम प्रकल्पाचे तंत्रज्ञ इरफान शेख यांनी भारतीय जैन संघटनेव्दारे पुरविण्यात येणा-या प्रत्येक मशिनला ट्रकर लावण्यात येणार असल्याचे सांगुन त्यांचे प्रात्यक्षिक यावेळी दिले. अकोला जिल्हयासाठी सुजलाम सुफलाम प्रकल्पाचे व्यवस्थापक नितीन राजवैद्य राहणार आहेत. तर सुपरवायजर श्रीकांत पोकळकर राहणार आहे. समन्वयासाठी व्हासअप ग्रुप तयार करण्यात येणार असून यात प्रशासकीय अधिकारी व भारतीय जैन संघटनेच्या मॅनेजर ,सुपरवायजर व सर्व तालुका कोआर्डीनेटर यांचा समावेश राहणार आहे.
अकोला जिल्हा कायम दुष्काळ मुक्त करण्यासाठी सुजलाम सुफलाम अकोला अभियानातंर्गत कामाचा आढावा घेण्यासाठी प्रत्येक सोमवारी जिल्हास्तरीय बैठक होणार आहे. तसेच प्रत्येक शुक्रवारी तालुकास्तरीय बैठक होणार आहे. बैठकीत उपस्थित राहतांना संबंधीत अधिकारी व यंत्रणेने आपली माहिती सोबत आणावी. असे जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिले आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भारतीय जैन संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुभाष गादीया यांनी केले. या आढावा सभेला उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, कृषी, जलसंधारण, भूजल सर्वेक्षण विभागाचे अधिकारी तसेच सुजलाम सुफलाम प्रकल्पाचे मॅनेजर ,सुपरवायजर व सर्व तालुका कोआर्डीनेटर व भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
अधिक वाचा : भारिप बहुजन महासंघाच्या वतीने दानापूर मतदारसंघात नविन मतदार नोंदणी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola