अकोला( शब्बीर खान) : अन्वी मिर्झापूर येथील एका रेशन माफियाकडून तब्बल दोन ट्रक म्हणजेच १३ लाख रुपयांचा तांदूळ पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने जप्त केल्यानंतर पुरवठा विभागाने सदर तांदूळ रेशनचा नसल्याचा अहवाल दिला आहे. त्यामुळे पोलिसांनी जप्त केलेला तब्बल १३ लाखांचा तांदूळ आला तरी कोठून, असा सवाल उपस्थित केल्या जात आहे. बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील अन्वी मिर्झापूर येथील एका गोदामात रेशन माफियांनी स्वस्त धान्य दुकान संचालकांमार्फत धान्याची अवैधरीत्या साठवणूक केली असून, तो काळ्या बाजारात विक्री होणार असल्याच्या माहितीवरून जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी छापा टाकून कारवाई केली. एमएच ३० एल १८६० आणि जीजे ०३ एटी ४१३३ क्रमांकाच्या दोन ट्रकमधील तांदूळ जप्त करण्यात आला. अन्वी मिर्झापूर येथील रहिवासी संतोष बाबुलाल जयस्वाल व गुजरातमधील सुरेंद्रनगर येथील रहिवासी जयेशभाई मनसुखभाई मकवाना या दोघांवर कारवाईचा प्रस्ताव विशेष पथकाने दिला; मात्र पुरवठा विभागाने हा तांदूळ रेशनचा नसल्याचा अहवाल दिला. त्यामुळे पोलिसांनी जप्त केलेला १३ लाख रुपयांचा तांदूळ साठा आहे तरी कुणाचा आणि तो कोठून आणण्यात आला, हा संशोधनाचा विषय निर्माण झाला आहे. असा आहे अहवाल १३ लाख रुपयांचा तांदूळ शासनाच्या स्वस्त धान्य दुकानातील पोत्यांमध्ये नसल्यामुळे तो तांदूळ रेशनचा आहे की नाही.
हे सांगता येत नाही, असा अहवाल देण्यात आला आहे; मात्र पुरवठा विभागाने तपासणी केल्यास सत्य समोर आले असते; परंतु पुरवठा विभागाने खोलात न जाता सरळ अहवाल देऊन रेशन माफियांना पाठीशी घातल्याचा आरोप करण्यात येत आहे. जीएसटीला दिला खो सदर १३ लाखांचा तांदूळ रेशनचा नसल्याचा अहवाल आल्यामुळे हा तांदूळ कोठून खरेदी-विक्री झाला, याचे देयक अद्याप समोर आले नाही. त्यामुळे सदर तांदुळासंदर्भात संशय निर्माण होत असून, हा तांदूळ रेशनचा नसेल तर ज्या ठिकाणावरून खरेदी-विक्री झाली त्याचे देयक व जीएसटी अद्याप सादर केलेली नसल्याने गौडबंगाल निर्माण झाले आहे. ६० पैसे किलोचा तांदूळ गुजरातमध्ये नेऊन त्याचेच पाकीटबंद पोहे तयार करून हा तांदूळ तब्बल १५ ते १८ रुपये किलोने विकण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास झाल्यास पुरवठा विभागाचे साटेलोटे उघड होण्याची शक्यता असून, पोलिसांनी त्या दिशेने तपास करण्याची गरज आहे.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola