अकोला :- पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या जनतेच्या समस्या निवारण सभेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. सोमवार दि. 15 ऑक्टोंबर 2018 रोजी झालेल्या या उपक्रमात विविध विभागांच्या 186 तक्रारी प्राप्त झाल्या. विशेष म्हणजे स्वत: पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी नवीन तक्रार घेऊन आलेल्या उपस्थित नागरिकांकडे जाऊन त्यांच्या तक्रारी स्विकारल्या. यावेळी त्यांनी तक्रारदारांची सहानुभूतीपूर्वक चौकशी करुन तक्रारींचा 15 दिवसांच्या आत निपटारा करण्यात येईल, असा दिलासाही तक्रारकर्त्याना दिला.
जनतेच्या तक्रार निवारण सभेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, अप्पर जिल्हाधिकारी नरेन्द्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी उज्वल चोरे आदींसह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन कटीबध्द असून पिक विमा, कर्ज प्रकरणं याबाबत शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण भासू दिली जाणार नाही. या बाबींचा जलदगतीने निपटारा होण्यासाठी सबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत, असे यावेळी पालकमंत्री यांनी सांगितले.
पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील पुढे म्हणाले की, नुकताच मी जिल्हयातील अकोला, बार्शीटाकळी व मुर्तिजापूर तालुक्यातील गावांना भेटी देवून पिक परिस्थितीची पाहणी केली आहे. पावसातील खंड, आद्रतेचे कमी प्रमाण यामुळे पिकांचे उत्पादन कमी होणार आहे. जिल्हयात पाच तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने मी तिन तालुक्यातील बारा गावांना भेट दिली आहे. पिक परिस्थिती व पाणीसाठयाची माहिती घेतली असून या माहितीचा गोषवारा मुख्यमंत्रीकडे सादर करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.
यानंतर पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी नवीन आलेल्या अर्जदारांचे निवेदनं जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय व इतर अधिका-यांसोबत स्वत: तक्रारकर्त्याकडे जावून स्विकारले. 15 दिवसाच्या आत सबंधीत विभागाकडून आपणास आपल्या तक्रारीवर काय कार्यवाही करण्यात आली, याबाबतचा अनुपालन अहवाल कळविण्यात येईल. अशी तक्रारकतर्यांना ग्वाही दिली व संबंधीत अधिका-यांना तशा सुचना दिल्या. जनतेच्या तक्रारींचे व्यवस्थीत समाधान व्हावे हा या उपक्रमामागचा उददेश असल्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील म्हणाले.
मागील सभेत प्राप्त झालेल्या जुन्या तक्रारींचा विभागवार आढावा यावेळी घेण्यात. यात महसुल, जिल्हा परिषद, मनपा, पोलीस विभाग, महावितरण, कृषी, सहकार आदी विभागाचा समावेश हेाता. पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी संबंधीत विभागाच्या तक्रारकर्त्यांचा नावाचा पुकारा केल्यानंतर प्रत्यक्ष संबधीत विभागाच्या अधिका-यांसमोर समक्ष तक्रार कर्त्यांची तक्रार जाणून घेवून या तक्रारींवर काय कारवाई करण्यात आली. याबाबतची माहिती अधिकाऱ्यांकडून त्यांनी जाणून घेतली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पंधरा दिवसांत कोणत्याही परिस्थितीत तक्रारींचे निराकरण करावे. तक्रारीवर काय कारवाई केली. याबाबतच्या अुनपालनाची प्रत आपल्याला व संबंधित तक्रारदाराला वेळेत देण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री यांनी यावेळी दिले. तसेच पालकमंत्री म्हणाले की, प्रशासनाकडून समस्या तातडीने सोडविल्या गेल्या पाहिजे अशी जनतेची अपेक्षा असते, तक्रार प्राप्त झाल्यावर त्याबाबतची प्राथमिक माहिती घेवूनच अधिकाऱ्यांनी जनता दरबारात उपस्थित राहावे, असेही ते म्हणाले.
आज झालेल्या जनतेच्या तक्रार निवारण सभेत एकूण 186 तक्रारी जनतेकडून प्राप्त झाल्या. यामध्ये वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्वरुपाच्या तक्रारींचा समावेश होता. विविध विभागांच्या कामांबाबतच्या लेखी स्वरूपातील तक्रारी नागरिकांनी पालकमंत्री यांना दिल्या. तक्रारींचा निपटारा करण्यासाठी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी संबंधित विभागाप्रमुखांकडे विचारणा करुन त्याचे त्वरित निराकरण करण्याबाबत सूचित केले. तत्पुर्वी पालकमंत्री यांनी मागील सभेत प्राप्त तक्रारींवर अधिका-यांनी काय कार्यवाही केली याबाबत चौकशी केली. झालेल्या कार्यवाहीवर तक्रारदारांचे समाधान झाले का, याची विचारणा त्यांनी तक्रारदारांना करुन पुढील तक्रारी स्विकारण्यास सुरुवात केली.
विभागनिहाय प्राप्त झालेल्या तक्रारींचा तपशील पुढील प्रमाणे आहे, महसूल विभाग – 63 तक्रारी, पोलीस विभाग— 15, जिल्हा परिषद- 52, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था – 02, महानगर पालिका – 16, अग्रणी बँक – -04, विद्युत विभाग – 08, भूमी अभिलेख – 05, कृषी विभाग –8, उपवनसंरक्षक-01, एकात्मिक आदिवासी विकास-01, समाज कल्याण -3, सहायक आयुक्त अन्न व औषधी प्रशासन-01, विपणन विभाग 01, जात पडताळणी – 01, पाटबंधारे विभाग – 02, वैद्यकीय महाविद्यालय- 02, व मुख्यमंत्री ग्राम सडक योजना – 01 अशा एकुण 186 तक्रारी यावेळी प्राप्त झाल्या.
तत्पूर्वी पालकमंत्री रणजीत पाटील यांनी कौशल्य विकास विभागाच्या सहकार्याने जसनागरा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जनता दरबारासाठी आलेल्या नागरिकांकरीता लावलेल्या अल्पोहारांच्या स्टाँलला भेट दिली. यावेळी त्यांच्य समवेत कौशल्य विकास विभागाचे अधिकारी दत्तात्रय ठाकरे उपस्थित होते.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola