मुंबई : पुढच्या काही दिवसांमध्ये होऊ घातलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार म्हणजे निव्वळ मंत्र्यांची संख्या वाढवण्याचा भाग नसून भाजपाची राजकीय खेळी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजपाच्या काही निष्क्रिय मंत्र्यांना डच्चू देऊन ते आपल्या इतर शिलेदारांना जागं करतीलच, पण शिवसेनेला दोन किंवा तीन मंत्रिपदं देऊन लोकसभा निवडणुकीसाठी त्यांची ‘टाळी’ मिळवण्याचा प्रयत्नही भाजपाकडून केला जाणार असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. भाजपाच्या कोट्यातील पाच जागा अजून भरायच्या आहेत आणि पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे कृषिमंत्रीपदही रिक्त आहे. तर,शिवसेना नेते दीपक सावंत यांनी जून महिन्यात आरोग्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असल्यानं एक जागा शिवसेनेच्या हक्काची आहे. परंतु, त्यांना अधिकच्या दोन जागा देऊन भाजपा ‘मातोश्री’ची नाराजी दूर करेल, असा अंदाज आहे.नवी ‘टीम देवेंद्र’ निवडण्याचं काम राज्य पातळीवर वेगानं सुरू आहे. त्यानंतर ही नावं दिल्लीश्वरांकडे पाठवली जातील. पितृपक्ष संपल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. परंतु, आता या विस्तारासाठी दसऱ्यानंतरचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे कुणाची दिवाळी ‘शुभ’ होणार आणि कुणाचा ‘फटाका फुटणार’, याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका खासगी कंपनीद्वारे एक सर्वेक्षण करून घेतलं. आपले मंत्री, आमदार, खासदार किती पाण्यात आणि किती खोलात आहेत, याची चाचपणी त्यांनी केलीय. या सर्वेक्षणाच्या आधारेच ते आपली नवी टीम निवडतील. स्वाभाविकच, ‘मिशन लोकसभा’ आणि नंतरच्या विधानसभा निवडणुकींची मोर्चेबांधणी करण्यासाठी जात, प्रदेश, भाषा या गोष्टी विचारात घेऊन मंत्र्यांची निवड केली जाईल, याकडे जाणकारांनी लक्ष वेधलं. शिवसेनेनं स्वबळाचा नारा दिला असला, नरेंद्र-देवेंद्र सरकारवर रोज टीकेचे बाण सोडले जात असले, तरी भाजपाकडून ‘लोकसभा-विधानसभा पॅकेज डील’ दिलं गेल्यास ते युतीसाठी तयार होऊ शकतात. विरोधक एकत्र मैदानात उतरण्याची चिन्हं असल्यानं भाजपालाही आपल्या या जुन्या मित्राची गरज भासणारच आहे. त्यांना गोंजारण्यासाठी अगदी वरिष्ठ पातळीपासून फोनाफोनी झाल्याचं अलीकडच्या काळात पाहायला मिळालं होतं. आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या निमित्तानं भाजपा ‘मास्टरस्ट्रोक’ लगावण्यासाठी सज्ज आहे.
अधिक वाचा : छत्रपती संभाजीं बद्दल आक्षेपार्ह उल्लेख, टीकेनंतर लेखिकेचा माफीनामा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola