अकोट(प्रतिनिधी)- आकोट शहरातच नव्हे तर संपूर्ण विदर्भात गाजत असलेल्या बोगस डॉक्टर प्रकरणातील जिल्हा कारागृहात अटकेत असलेला आरोपी निखिल गांधीचा जामीन अर्ज अकोटच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे बोगस डॉ.निखिल गांधी याचा कारागृहातुन बाहेर येण्याचा मार्ग बंद झाला आहे.
बोगस डॉ.निखिल नंदकिशोर गांधी याच्या विरुद्ध आकोट शहर पोलीस स्टेशनला शहरात सिटी क्रिटिकल केअर हॉस्पिटल चालविणारे डॉ.श्यामसुंदर वल्लभदास केला यांनी त्यांची खोटी कागदपत्र देऊन फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार दिली होती.याबाबत आकोट शहर पोलिसांनी चौकशी करून भादवीच्या कलम ३३६,४०६,४२०,४६९, ४७१ व २४ तसेच १९६१ च्या मेडिकल प्रॅक्टिशनर ऍक्टच्या कलम ३३ नुसार कलमे लावण्यात आली होती,तर पुढे याच प्रकरणात फिर्यादी डॉ.श्यामसुंदर केला व डॉ.डी.एच.राठी यांना आरोपी करण्यात येऊन नव्याने बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ऍक्टची ३ व ६ ही कलमे वाढविण्यात आली होती.
सदरहू प्रकरणात निखिल गांधी याला अकोटच्या न्यायालयातून अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता.मात्र जवळपास एक महिन्याच्या कालावधीनंतर पोलिसांचे म्हणणे ग्राह्य धरून न्यायालयाने त्याचा जामीन रद्द केला होता.त्यानंतर गांधीने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातून अटकपूर्व जामीन मिळविण्याचा देखील प्रयत्न केला परंतु न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळून लावला. निखिल गांधीला उच्च न्यायालयाने देखील जामीन नाकारल्यावर त्याने दि.१४ सप्टेंबर ला आकोट शहर पोलिसांसमोर शरणागती पत्करली.पोलिसांनी त्याची पाच दिवसांची पोलीस कोठडी घेऊन तपासाला गती दिली.तेव्हापासून म्हणजेच दि. १९ सप्टेंबर ला बोगस डॉ.निखिल गांधी याची अकोला जिल्हा कारागृहात दि. १ ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती, तेव्हापासून तो जिल्हा कारागृहातच आहे.तर डॉ.केला व राठी यांना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
बोगस डॉ.निखिल गांधीने नियमित जामीन मिळण्यासाठी अकोटच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला असता आकोट शहर पोलिसांनी त्याच्या जामीन अर्जाला विरोध करून नमूद आरोपी हा बाहेर आल्यावर पुन्हा बोगस डॉ.म्हणून प्रॅक्टिस सुरू करण्याचा प्रयत्न करेल.याच प्रकरणातील इतर दोन आरोपी डॉ.श्याम केला व डॉ.डी. एच.राठी हे उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवून मोकळे फिरत असल्याने हे तिघे मिळून सदरहू प्रकरणातील साक्षीदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच सदरहू प्रकरणात पोलीस कोठडी दरम्यान आरोपीने दिलेल्या माहितीची खातरजमा करून आवश्यक कागदपत्रे जप्त करणे आवश्यक असल्याने बोगस डॉ.निखिल गांधीला जामीन देण्यात येऊ नये असा युक्तिवाद सरकारी पक्षाचे वकील अजित देशमुख यांनी विद्यमान न्यायालयात केला तो ग्राह्य धरून बोगस डॉ.निखिल गांधीचा नियमित जामीन अर्ज फेटाळण्यात आला.
अधिक वाचा : अकोट येथील सहकारी पतसंस्था खातेदारांना ५ लाखाने फसविनारा फरार आरोपी अखेर गजाआड
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola