भारताच्या भालाफेकपटू संदीप चौधरी, जलतरणपटू सुयश जाधव आणि धावपटू रक्षिताने पॅरा-एशियाड स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. यात संदीपने जागतिक विक्रमाची नोंद केली. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसअखेर भारताने तीन सुवर्ण, सहा रौप्य, सात ब्राँझ अशी एकूण ११ पदके मिळवून पदकतक्त्यात सहावे स्थान मिळवले आहे.
सोमवारी सकाळच्या सत्रात संदीपने भालाफेकमध्ये पुरुषांच्या एफ ४२-४४/६१-६४ गटातून अव्वल स्थान पटकावून भारताच्या खात्यात पहिले पदक जमा केले. मध्यमपल्ल्याची धावपटू रक्षिता (टी ११, १५०० मीटर) आणि जलतरणपटू सुयश नारायण जाधवने (एस ७, ५० मीटर बटरफ्लाय) यांनी आणखी दोन सुवर्णपदके जमा केली. संदीप चौधरीने ६०.०१ मीटर कामगिरी नोंदवली. त्याने तिसऱ्या प्रयत्नात आपली ही सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. त्याने १९८०मधील चीनच्या मिंगजिए गावोचा ५९.८२ मीटरचा विक्रम मोडित काढला. संदीप चौधरी म्हणाला, ‘पॅरा-एशियाडसाठी मी उत्तम तयारी केली होती. जागतिक विक्रमासह सुवर्णयश मिळवू शकलो, याचा आनंद आहे. मला या कामगिरीवर समाधान मानायचे नाही. आता माझे लक्ष दुबईत होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेवर असणार आहे. या कामगिरीत माझे प्रशिक्षक आणि पॅरालिंपिक समितीचा तेवढाच वाटा आहे.’
यानंतर जलतरणमध्ये ५० मीटर बटरफ्लायमध्ये सुयश जाधवने ३२.७१ सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदकाची कमाई केली. चीनच्या हाँग यंगने (३३.५४ से.) रौप्य, तर थायलंडच्या बूनयारितने (३८.०९ से.) ब्राँझपदक मिळवले. जलतरणमध्ये भारताने चार पदकांची कमाई केली. सुयशच्या सुवर्णपदकाव्यतिरिक्त यात तीन ब्राँझपदकांचा समावेश होता. महिलांच्या १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत रक्षिताने ५ मिनिटे ४०.६४ सेकंद वेळ नोंदवून अव्वल क्रमांक पटकावला. पॅरा-पॉवरलिफ्टिंगमध्ये भारताने रौप्यपदक मिळवले, तर शूटिंगमध्ये एक रौप्य आणि एक ब्राँझपदक पटकावले.
अधिक वाचा : महेंद्रसिंह धोनी विजय हजारे चषकात खेळण्याची शक्यता
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola