अकोला – पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा हा सुशिक्षित बेरोजगारांसाठी एक मोठी संधी आहे. या माध्यमातून बेरोजगारांनी संधीचे सोने करुन स्वत:सोबतच महाराष्ट्राचा विकास करावा. तसेच अकोला जिल्हयाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. विशेषत: शेतकरी, बेरोजगार व महिलांच्या प्रगतीसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. दरम्यान, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठात इनक्युबेशन सेंटरसाठी 5 कोटी रुपये निधीची घोषणा यावेळी श्री. मुनगंटीवार यांनी केले.
अकोला, वाशिम, बुलडाणा जिल्हयातील सुशिक्षित बेराजगार उमेदवारांना नोकरीची संधी प्राप्त व्हावी या उदेशाने अकोला येथील श्रीमती लक्ष्मीबाई राधाकिसन तोष्णीवाल महाविदयालयात कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता संचालनालय व व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्या संयुक्त विदयमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उदघाटन श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कौशल्य विकास व उदयोजकता विभागाचे राज्यमंत्री तथा अकोला जिल्हयाचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून महापौर विजय अग्रवाल, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार हरिष पिंपळे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले, कौशल्य विकास व उदयोजकता विभागाचे सचिव असिमकुमार गुप्ता, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे सहसंचालक पी.टी. देवतळे, माजी आमदार सर्वश्री डॉ. जगननाथ ढोणे, वसंतराव खोटरे, नारायण गव्हाणकर, माजी महापौर उज्वलाताई देशमुख, नगरसेवक हरिष अलीमचंदाणी, डॉ. आर.बी. हेडा, ॲड. मोतीसिंह मोहता, आशिष पवित्रकार आदीसह अशोक ओळंबे पाटील, गोपी ठाकरे आदींची उपस्थिती होती.
भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. या तरुणांनी कौशल्य विकासाचे शिक्षण घेऊन देश घडवण्याचे कार्य करावे, असे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले की, तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी केंद्र सरकारने अनेक योजना सुरु केल्या आहेत. स्टार्टअप इंडिया, स्टॅण्डअप इंडिया, मुद्रा योजना या सारख्या योजनांचा फायदा घेऊन तरुणांनी स्वयंपूर्ण व्हावे. आपल्या देशातच वेगवेगळया वस्तुंचे उत्पादन करुन देशाची प्रगती करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
रोजगार मेळाव्याचे केलेल्या काटेकोर नियोजनाबददल श्री. मुनगंटीवार यांनी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे कौतुक केले. हा मेळावा इतर जिल्हयांसाठी आदर्श ठरणार आहे. या पुढेही अशा मेळाव्यांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील म्हणाले की, एक सामाजिक बांधिलकी म्हणून युवकांना नोकरीची संधी मिळावी यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. भविष्यातही अशाच प्रकारच्या मेळाव्यांचे आयोजन करुन युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जातील. शासन आपल्या पाठीशी आहे. आजच्या मेळाव्यात ज्या युवकांना नोकरीची संधी मिळणार नाही, त्यांनी खचून जावू नये, त्यांची आधीच नोंदणी झाली असल्यामुळे त्यांना आवश्यक प्रशिक्षण देऊन पुन्हा नोकरीची संधी उपलब्ध करुन दिली जाईल. अकोला जिल्हयातील आदिवासी भागात बांबूचे मोठया प्रमाणात उत्पादन होते, या बांबुच्या माध्यमातून तरुणांना व्यवसायाची संधी मिळावी यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठात बांबू प्रक्रीया प्रकल्प उभारण्याची मागणी यावेळी पालकमंत्री यांनी केली.
यावेळी आमदार गोपीकिशन बाजोरिया, सचिव असिम कुमार गुप्ता यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक श्री. देवतळे यांनी केले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात काही उमेदवारांना नोकरीचे ऑफर लेटर देण्यात आले. तसेच सूवर्ण पदक विजेती खेळाडू साक्षी गायधनी हीचा गौरव करण्यात आला. या मेळाव्यासाठी मोठया संख्यने सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांची उपस्थिती होती.
या मेळाव्याला मुंबई, पुणे, नाशिक व औरंगाबाद व इतर महत्वाच्या शहरांमधील नामांकित एकूण 43 कंपनींचे प्रतिनीधी उपस्थित होते. श्रीमती एल.आर.टी. महाविदयालयासह आर.एल.टी. महाविदयालय आणि सिताबाई कला महाविदयालय येथे उमेदवारांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे 9 हजार पेक्षा जास्त विदयार्थ्यांनी मेळाव्यासाठी नावनोंदणी केली होती. साधारण 3 हजार 381 उमेदवारांना नोकरीची संधी मिळाली. अत्यंत नियोजनबध्द पध्दतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याला उपस्थित उमेदवारांसाठी जेवणाचीसुध्दा व्यवस्था करण्यात आली होती. विशेष म्हणजे स्वत: पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील हे सर्व उमेदवारांच्या मुलाखती संपेपर्यंत थांबले होते.
अधिक वाचा : वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते चंद्रकांत पाटील दिग्दर्शित मोर्णा स्वगत माहितीपटाचे लोकार्पण
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola