अकोला (शब्बीर खान) : विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये विक्री केले जाणारे दूध भेसळयुक्त तर नाही ना? याची पाहणी आणि तपासणी करण्याकरिता केंद्र शासनाच्या भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाचे (एफएसएसएआय) एक पथक विदर्भात दाखल झाले असून, या पथकाने अकोल्यासह लगतच्या जिल्ह्यांमधील दुधाचे नमुने तपासणीकरिता घेतल्याने दुधात भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. देशभरातील दुधांचे नमुने गोळा करून त्याच्या गुणवत्तेचा आढावा घेण्याकरिता हे पथक विदर्भात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दुधाच्या नमुन्यांच्या तपासणीतून दुधात काही बदल किंवा भेसळ होत आहे का, याचा आढावा हे पथक घेणार असून, त्याचा अहवाल नंतर केंद्र सरकारला सादर केला जाणार आहे. अहवाल प्राप्तीनंतर दुधात भेसळ करणारयावर काय कारवाई करावयाची याचा निणय केंद्र सरकार घेणार असल्याची माहितीही विश्वसनीय सूत्रांनी दिली. देशपातळीवर अन्नपदार्थांचा दर्जा व त्याद्वारे नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या भारतीय अन्न सुरक्षा आणि मानव प्राधिकरणाच्या चमूने सद्यस्थितीत दुधाच्या तपासणीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील अन्न व औषधी प्रशासनाच्या हैद्राबाद येथील विमटा लॅबचे पथकसुद्धा आले आहे. देशातील विविध राज्यांमध्ये एफएसएसएआय व प्रयोगशाळेतील अधिकारी दुधाचे नमुने गोळा करण्याच्या कामी लागले आहेत. बदलत्या काळानुसार दुधाच्या गुणवत्तेत किंवा गुणधर्मात काही बदल झाला आहे का, पूर्वीप्रमाणे मिळणाऱ्या नैसर्गिक दुधातील घटकांमध्ये काही बदल झालेत का? गाय, म्हैस यांच्या दुधाच्या गुणवत्तेत काही बदल झालेत का?
पूर्वीच्या दुधात व आताच्या दुधात काही बदल झालेत का? या सर्व बाबी तपासून पाहण्यासाठी दूध नमुने गोळा केले जात आहेत. एफएसएसएआयचे अधिकारी विदर्भात दाखल झाले असून, त्यांनी अकोल्यासह नागपूर, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम आणि अमरावतीमधील दुधाचे नमुने गोळा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या पथकाद्वारे केले जाणारे सर्वेक्षण अद्याप सुरू असून, दूध तपासणीच्या अहवालानंतर देशभरातील दुधाचे चित्र स्पष्ट होणार आहे. अहवालाच्या अनुषंगाने केंद्र शासन पुढील कारवाईची दिशा ‘करविणार आहे. प्राप्त माहितीनुसार, अमरावतीच्या अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान विविध ठिकाणी दुधाचे सहा नमुने प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठवले होते. त्यापैकी दुधाचे दोन नमुने अप्रमाणित आढळून आले आहेत. यावरून अमरावती शहरातही अप्रमाणित दुधांची विक्री होत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्या अनुषंगाने राज्य किंवा देशभरातही अशाच प्रकारची स्थिती असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाचे अधिकारी विदर्भाच्या दौऱ्यावर आले असून, या पथकाकडून दुधाचे नमुने गोळा करून, त्याची तपासणी केली जाणार आहे. देशभरातील विविध राज्यांतून दूध नमुने गोळा केले जात असून, दूध नमुन्यांच्या तपासणीनंतर शासनाची काय भूमिका राहील, हे कळेलच, अशी माहिती सचिन केदारे, सहायक आयुक्त (अन्न), अमरावती यांनी दिली आहे. एवंदरीतच या प्रकारामुळे दुधात भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
अधिक वाचा : अकोल्यात रेल्वेखाली आल्याने युवकाचा मृत्यू
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola