अकोला- शेतातून घरी जात असलेल्या बैलगाडीला भरधाव बसने जोरदार धडक दिली. या धडकेत बैलगाडीतील शेतकरी युवक जागीच ठार झाला; तर दोघे जण गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी ३० सप्टेंबरला रात्री आठ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर हिंदुस्तान लिव्हर कंपनी जवळ घडली. या घटनेमुळे रिधोरा गावात शोककळा पसरली.
या संदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बाळू वासुदेव अत्तरकार वय ३२, वैभव माणिक अघडते वय २५, व दीपक सुरेश अघडते वय २१ हे तिघे जण शेतात काम करण्यासाठी गेले होते. शेतातून रविवारी संध्याकाळी सात वाजेपर्यंत ते शेतात काम करीत होते. त्यानंतर घरी येण्यासाठी त्यांनी बैलगाडी जुंपली आणि त्यात बसून घरी येऊ लागले. राष्ट्रीय महामार्गाने येत असताना पाठीमागून आलेल्या भरधाव बसचालकाने बैलगाडीला जबरदस्त धडक दिली. यावेळी बैलगाडीतील बाळू वासुदेव अत्तरकार याचा जागीच मृत्यू झाला; तर दीपक सुरेश अघडते हा गंभीर जखमी झाला. वैभव अघडते हा युवक बैलगाडीतून दूर फेकल्याने तो सुद्धा जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच रिधोरावाशीयांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत बसचा चालक व वाहक दोघेजण पळून गेले होते. ग्रामपंचायत सदस्य मंगेश गवई, कुंदन लोंढे, राजेश अघडते, अजय बोराखडे, पोलीस पाटील सुजय देशमुख, आशिष लोकरे यांच्यासह गावकऱ्यांनी तिघांनाही अकोला येथे रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी बाळूला मृत घोषित केले. बाळू हा एकुलता एक असून त्याला तीन मुले आहेत. तो मजुरीचे काम करीत असे. प्रामाणिक व मेहनती असल्याने त्यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. बाळूच्या अपघाती मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण कुटुंब आता उघड्यावर आले आहे. अपघाताची माहिती रिधोरा येथे वाऱ्यासारखी पसरल्यानंतर गावावर शोककळा पसरली होती. सामाजीक कार्यकर्ते पराग गवई यांनी जखमींना उपचारासाठी मदत केली. तर त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.
युवा शेतकऱ्यांचा मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या बस चालक यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे, ज्या बसने बैलगाडीला धडक दिली त्या बसचे वेग नियंत्रक तपासून या बसचा वेग किती होता याचा तपास करून बस चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
अधिक वाचा : हरिहर पेठेतील जुगार अड्ड्यावर छापा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola