अकोला: ज्ञान हे वाघीणीचे दुध असुन गंथ वाचनाने मानवाला कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची ताकद मिळते. म्हणुन ज्ञान प्राप्त करुन जीवनात यशस्वी होण्यासाठी ग्रंथाचे वाचन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने 1 कोटी 81 लक्ष रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या तीन मजली अध्यावत नविन विस्तारीत ई-लायब्रीरच्या इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई वाघोडे या होत्या. यावेळी आमदार गोपीकिशन बाजोरीया यांची प्रमुख उपस्थिती होती.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वाचाल तर वाचाल असे सांगितले असुन सामाजिक , राजकीय व आर्थिक प्रगतीसाठी शिक्षीत होणे गरजेचे आहे. असे सांगुन पालकमंत्री पुढे म्हणाले की, आपण जे बघतो, जे वाचतो तेच आत्मसात करतो. हे आत्मसात केलेले ज्ञान आपले जीवनात बदल घडविण्यासाठी उपयोगी पडते. यामुळे विदयार्थ्यांच्या सोईसाठी व त्यांना ज्ञान प्राप्त होण्यासाठी सामाजिक दायित्व म्हणुन ई-लायब्ररी साठी जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्य पुर्ण योजनेतुन निधी उपलब्ध करुन दिला असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले. विदयार्थ्यांनी स्पर्धा परिक्षाच्या तयारीसाठी व ज्ञान वर्धन करण्यासाठी या लायब्ररीचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
पालकमंत्री पुढे म्हणाले की, कोणतीही गोष्ट रद्दी होत नाही म्हणुन आपल्याकडील वाचुन झालेली पुस्तके ग्रंथलयात दान करावी. असे आवाहन त्यांनी केले. वाचन संस्कृती समृध्द करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्या वाढदिवसाच्या यथा शक्ती पुस्तके वाचनालयात दान करावी. असा संकल्प करावा असे आवाहनही त्यांनी केले.
बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्धी व्हावी म्हणुन येत्या 4 ऑक्टोंबर रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन श्रीमती लक्ष्मीबाई राधाकिशन तोष्णीवाल महाविदयालय अकोला येथे करण्यात आले आहे. या मेळाव्यात मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद अशा शहरातील 36 कंपन्याचा सहभाग राहणार आहे. व त्याच दिवशी बेरोजगाराची निवड करण्यात येणार आहे. या मेळाव्यात आपल्या विभागातील 1700 बेरोजगार युवक युवतींना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी उमेदवारांनी औद्योगीक प्रशिक्षण संस्था येथे करुन किंवा या कार्यक्रमाचे प्रकल्प प्रमुख आरती लढ्ढा यांच्याकडे आपल्या नावाची नोंदणी टोकण प्राप्त करुन घ्यावे व शैक्षणिक पात्रता व संबंधीत मुळ कागदपत्रे व त्यांच्या सत्यप्रतीसह रोजगार मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले.
प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सुसज्ज असे ई-लायब्ररी सुरू करावी अशी मागणी आमदार बाजोरीया यांनी केली. व ई-लायब्ररीचा लाभ घेण्याची युवकांना आवाहन केले.
वाचन संस्कृती वाढविण्यासाठी या लायब्ररीचा फायदा होईल असे सांगुन कार्यक्रमाच्या अध्यक्षा तथा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या वाघोडे यांनी गोरगरीब व सामान्य जनतेतील विदयार्थ्यांनी या ई-लायब्ररीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते कोनशिलाचे अनावरण करुन ई-लायब्ररीचे लोकार्पण करण्यात आले. तसेच स्पर्धा परिक्षा दालनाचे फित कापुन उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमरावती येथील शासकीय ग्रंथालयाचे ग्रंथपाल राजेश पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन बाळकृष्ण बिडवाईक यांनी केले. यावेळी सिंधु सिनीअर सिटीजन असोशिएशनेचे अध्यक्ष ग्यानचंद वाधवानी यांनी शंभर पुस्तके भेट दिली.
या कार्यक्रमाला माजी आमदार जगन्नाथ् ढोणे , नारायण गव्हाणकर, माजी महापौर उज्वलाताई देशमुख , नगरसेवक हरिश अलिमचंदाणी , गोपी ठाकरे , आशिष पवित्रकार, अमरावती विभागाचे सहायक ग्रंथालय संचालक जगदिश पाटील , सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एमआर चव्हाण, अमरावतीचे ग्रंथालय अधिकारी दिपक गेडाम, ॲड.मोतीसिंग मोहता, डॉ.अशोक ओळंबे, शरद झांबरे, सत्यनारायण बाहेती, सनातन वाचनालयाचे श्रीकिसनजी अग्रवाल यांच्यासह ग्रंथालय विभागाचे अधिकारी कर्मचारी विविध वाचनालयाचे पदाधिकारी, स्पर्धा परिक्षेचे विदयार्थी यांची उपस्थिती होती.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola