‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी अभिनेता नाना पाटेकर यांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप करून अभिनेत्री तनुश्री दत्ताने खळबळ उडवून दिली आहे. मात्र तनुश्रीचे हे आरोप नानाने फेटाळून लावले असून याप्रकरणी तनुश्रीला कोर्टात खेचणार असल्याचं स्पष्ट केलंय.
एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना नाना पाटेकर यांनी तनुश्रीचे आरोप फेटाळून लावले. ‘तिने हे आरोप का केले हे मी कसं सांगू शकतो? ती असं का बोलत आहे? हे मला कळेल का? लैंगिक शोषणाशी माझा काय संबंध? तिला नेमकं काय म्हणायचं आहे? सेटवर माझ्यासोबत ५० ते १०० लोक असायचे’, असं नानांनी स्पष्ट केलं. ‘मी तिच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे. पण मीडियाला सांगून काय उपयोग? तुम्ही काहीही बातम्या चालवाल. ज्यांना जे म्हणायचे ते म्हणावं, मी आपलं काम करत राहणार’, असंही त्यांनी सांगितलं.
एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तनुश्रीनं नानांवर हा आरोप केला होता. ‘मी एका गाण्याचं शूटींग करत असताना गणेश आचार्य ते गाणं कोरिओग्राफ करत होते. नाना त्या गाण्यात नव्हते. तरीही ते सेटवर येत आणि मला स्टेप शिकवण्याचा प्रयत्न करत. त्यांनी अनेकदा माझा हात पकडला होता. त्यांच्या या वर्तनाची मी चित्रपट निर्मात्यांकडं तक्रार देखील केली. पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही. उलट मला त्या गाण्यातून काढून टाकण्यात आलं. या प्रकरणात नाना यांच्यासोबत गणेश आचार्य देखील दोषी असून ते खोटं बोलत आहेत. आचार्य दुटप्पी भूमिका घेतात,’ असं तनुश्रीनं म्हटलं होतं.