पातुर (सुनील गाडगे): पातूरमधील सिंगल नाल्याजवळ शनिवारी एका शेतकरयावर पटटेदार वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकरयावर रूग्णालयात दाखल करून उपचार करण्यात येत असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पातूरच्या मुजावर पुरा भागातील रहिवासी शेख मोबीन शेख इमाम हे शनिवारी सकाळी सिंगराल नाल्यानजीक जिरायत भाग क्रमांक १, शेत सव्हे क्रमांक ३११ येथे आपल्या शेतातील पराटीला पाणी देत असताना अचानक त्यांच्यावर वाघाने हल्ला केला. वाघाने त्यांच्या छातीवर पंजा मारल्याने ते क्षणार्धात खाली कोसळले. त्यांच्यासोबतच आजूबाजूच्या शेतात काम करणारे शेतकरी आणि महिला मजूर यांनी यावेळी आरडाओरडा केल्याने वाघाने तेथून पळ काढला. दरम्यान, वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेले शेख मोबीन शेख इमाम यांना अकोला येथील सर्वोपचार रूग्णालयात दाखल करून उपचार करण्यात येत आहेत. भर दिवसा शेतात वाघाने केलेल्या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून, शेतकरी आणि शेतमजूर भयभीत झाले आहेत. या घटनेची वन विभागाला माहिती देण्यात आली असून, वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेले शेख मोबीन शेख इमाम यांना शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत असून, वन विभागाने या वाघाचाही बंदोबस्त करावा अशी परिसरातील शेतकरी मागणी करीत आहेत.