मुंबई: रविवारी राज्यभर गणेश विसर्जनाचा जल्लोष सुरू असताना काही भागांत दुर्घटनांमुळे भक्तांच्या उत्साहावर विरजन पडले. राज्यात विसर्जन करताना 26 जणांचा बुडून मृत्यू झाला, तर मुंबईत घाटकोपर येथे एका २४ वर्षांच्या तरुणाचा मिरवणुकीत नाचताना मृत्यू झाला.
मुंबईत गणपती विसर्जनासाठी भांडुप येथील भांडुपेश्वर तलावात उतरलेल्या यज्ञेश मळेकर (३२) याचा बुडून मृत्यू झाला. भांडुपच्या भवानी नगर परिसरात राहणारा यज्ञेश रात्री दोनच्या सुमारास इतर जीवरक्षकांसोबत गणेश विसर्जनासाठी तलावात उतरला होता. एका ठिकाणी त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. घाटकोपरच्या अशोक नगरमध्ये विसर्जन मिरवणुकीमध्ये अमित वर्मा (२४) याचा मृत्यू झाला. मिरवणुकीत नाचता-नाचता अमित कोसळला. त्याला राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तेथे दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
उत्तर महाराष्ट्रात सहा तरुणांचा बुडून मृत्यू झाला. त्यात जळगावमधील चार आणि नाशिकमधील दोन युवकांचा समावेश आहे. चेतनानगर येथील महाविद्यालयीन विद्यार्थी चेतन बोराडे याचा वालदेवी नदीत बुडून मृत्यू झाला.
विसर्जनासाठी नदीत उतरलेल्या चेतनला पाण्याचा अंदाज आला नाही. तो गाळात रुतल्याने त्याचा मृत्यू झाला. दिंडोरी तालुक्यातील जालखेड येथे पाझर तलावात बुडून विनोद खराटे (१५) याचा बुडून मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्य़ात अविनाश कोळी (२०, सुप्रीम कॉलनी, जळगाव) या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाला. भुसावळ तालुक्यात तापी नदीत नितीन मराठे (३२, ऑर्डनन्स फॅक्टरी, दर्यापूर शिवार) याचा, तर जामनेर तालुक्यातील पळासखेडे बुद्रुक येथे मनीष दलाल या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाला. भडगाव येथील लाडकूबाई माध्यमिक विद्यामंदिरमधील दहावीचा विद्यार्थी प्रफुल्ल पाटील (वलवाडी, भडगाव) याचाही नदीत बुडून मृत्यू झाला.
जालना येथील मोती तलावात विसर्जनावेळी अमोल रणमुळे, निहाल चौधरी (वय २६) आणि शेखर भदनेकर (वय २०) यांचा बुडून मृत्यू झाला. मूर्ती पाण्यात नेत असताना हे तिघेही मूर्ती खाली दबले गेल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. जुन्नर तालुक्यात कावळ पिंपरी येथे पाच मुले बुडाली होती. त्यापैकी तिघांचा बुडून मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. बुलडाण्यातील शेलगावमध्ये विसर्जनासाठी धरणात उतरलेल्या महादेव ताकतोडे आणि पुरुषोत्तम सोळाके यांचा बुडून मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले.
पुण्यात देहुगाव येथे इंद्राणी नदीत बुडून एका १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. अहमदनगरमध्ये संगमनेर येथे प्रवरा नदीत विसर्जनावेळी दोन तरुण वाहून गेले. त्यापैकी एकाला वाचवण्यात आले आहे, तर नीरव जाधव बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले. अमरावतीच्या वरुड तालुक्यात खदानीत विसर्जनासाठी उतरलेल्या राहुल नेरकर याचा बुडून मृत्यू झाला. तर साताऱ्यातील माहुली गावाजवळील कृष्णा नदीत बुडून दोघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. सोलापुरातही एकाचा विसर्जनादरम्यान मृत्यू झाला आहे. भंडारा जिल्ह्य़ातील पवनी तालुक्यातील सिंगोरी येथील मामा तलावात घटविसर्जनासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला. वैभव संभा आडे (१४) आणि संकेत कविंद्रकुमार कन्नाके (१५) अशी त्यांची नावे आहेत.
कुठे किती दगावले?
जळगाव – ४
मुंबई – २
जालना – ३
जुन्नर – ३
नाशिक – २
बुलडाणा – २
सातारा – २
अकोला – १
भंडारा – २
यवतमाळ – २
पुणे-१, नगर – १
सोलापूर -१