अकोला – मतदार नोंदणी कार्यक्रमानुसार काम करण्यास स्पष्ट नकार देऊन मतदार केंद्रस्तरीय अधिकारी(बीएलओ) म्हणून नियुक्ती केलेले आदेश स्वीकारण्यास नकार देणाऱ्या पाच शिक्षकांविरुद्ध नायब तहसीलदार यांच्या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईवरून शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत.
डाबकी रोडवरील मनपा उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्रमांक १० येथील शिक्षक मगफूर अहमद नूर अहमद, अ. कयुम अ. मूनाफ, मो. जावेद अ. रज्जाक, सै. जफर सै. गफूर व सै. रशिद फतेह मोहम्मद यांच्याविरुद्ध भांदवि कलम १८८ लोकप्रतिनिधी अधिनियम १९५०, ३२ परिशिष्ट २९, लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१, परिशिष्ट १३४ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघ यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शिक्षकांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पदावर नियुक्ती केल्याचे आदेश पारीत करण्यात आले होते.
मुख्याध्यापकांनी या शिक्षकांना हे आदेश दिले असता त्यांनी आदेश स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला होता. नंतर मुख्याध्यापकांनी तसा अहवाल उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठवला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. गेल्या वर्षीसुद्धा शिक्षकांनी बीएलओ म्हणून आदेश स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यानुसार एका शिक्षकाविरुद्ध सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. प्रशासनाने शिक्षकांचाही विचार करावा शहरातील बहुतांश शाळांतील मुख्याध्यापकांसह सर्वच शिक्षकांच्या नियुक्ती बीएलओ म्हणून करण्यात आली आहे. या नियुक्तीला शिक्षकांचा विरोध नाही. तर ज्या परिसरात शाळा आहे. त्याच परिसरात बीएलओ म्हणून नियुक्ती केल्यास शिक्षकांना शाळेकडेही लक्ष देता येईल. मात्र तसे न झाल्याने अनेक शिक्षकांत नाराजी दिसून येत आहे. परिणामी विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसानही होत आहे. शिक्षकांच्या नियुक्ती करताना कार्यकक्षेचा विचार व्हावा, अशा भावना शिक्षकांनी व्यक्त केल्या आहेत.
यापूर्वीच बीएलओ म्हणून काम करण्यास नकार दिल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता. मात्र काही शिक्षकांनी हेकेखोरपणाची भूमिका घेतली होती. नंतर प्रशासनाच्या इशाऱ्यानंतर त्यांनी काम करण्यास सुरुवात केली.
अधिक वाचा : गोरगरीबांचे जीवनमान बदलवणारी आयुष्यमान भारत योजना तळागाळापर्यंत पोहोचवा – पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola