अकोला – समाजातील वंचीत, गोरगरीब नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, त्यांना उत्तम प्रकारचे उपचार मिळावे यासाठी आजपासून सुरु करण्यात आलेली आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमुळे गोरगरीबांच्या जीवनमानात बदल होणार आहे, ही योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत, असे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले.
आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे लोकार्पण आज पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील व महाराष्ट्र कृषी व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तथा खासदार संजय धोत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन भवन सभागृहात करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई वाघोडे, महापौर विजय अग्रवाल, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, नागपूर येथील सहायक आयुक्त कुलदीप त्रिवेदी, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, माजी आमदार जगनाथ ढोणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आरती कुलवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खिल्लारे, डॉ. अश्विनी खडसे आदींसह वैदयकीय अधिकारी, आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्य मित्र आदींची उपस्थिती होती.
प्रारंभी झारखंड राज्यातील रांची येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे देशपातळीवरील झालेल्या उदघाटन कार्यक्रमाचे प्रक्षेपण यावेळी सभागृहात दाखविण्यात आले. आयुष्यमान भारत ही योजना जगातील सर्वात मोठी आरोग्य सुरक्षा योजना असल्याचे सांगुन पालकमंत्री म्हणाले की, गरीबांना उत्तम आरोग्य सुविधा देण्याचा या योजनेचा हेतु आहे. वैद्यकीय उपचार हे बरेचदा सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर असतात. सामान्यांना उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी ही योजना आहे. या योजनेमध्ये गंभीर आजारासह एकूण 1300 रोगांवर उपचार करण्यात येतील. सरकारी सोबतच खाजगी रुग्णालयातही या योजनेच्या माध्यमातून गरीबांना उपचार उपलब्ध होणार आहे. पुर्णपणे मोफत असणारी ही योजना आरोग्यसेवेतील महत्वाचा टप्पा आहे. राज्यात महात्मा फुले जन आरोग्य योजना सोबतच ही योजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. ही ऐतिहासिक योजना आपल्या जिल्हयात सर्वांनी मिळवून यशस्वी करावी, असेही ते म्हणाले.
खासदार संजय धोत्रे म्हणाले की, सर्वसामान्यांच्या हितासाठी मागील काही वर्षांपासून अनेक क्रांतीकारी योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. आयुष्यमान भारत ही योजना अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून गोरगरीबांना उत्तम प्रकारच्या आरोग्य सुविधा मिळणार आहेत. याचा लाभ समाजातील वंचीत व गोरगरीबांनी घेऊन आपले जीवनमान सुदृढ व आरोग्यदायी करावे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई वाघोडे यांनी आयुष्यमान भारत ही योजना ग्रामीण भागात प्रभावीपने राबविण्यात येईल, असे सांगितले. तर महापौर विजय अग्रवाल म्हणाले की, सर्वसामान्यांसाठी आयुष्यमान भारत ही योजना उपयुक्त आहे. या योजनेमुळे खऱ्या अर्थाने गोरगरीबांना उत्तम आरोग्य सुविधा मिळण्यास मदत होणार आहे.
जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय म्हणाले की, गोरगरीबांच्या उत्तम आरोग्यासाठी देशात आयुष्यमान भारत ही योजना व्यापक प्रमाणात राबविण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ सुमारे 50 कोटी लोकांना होणार आहे. यापूर्वी राबविण्यात आलेल्या स्वच्छ भारत योजनेमुळे लाखो बालकांना जीवनदान मिळाले आहे. आपला अकोला जिल्हा हगणदारीमुक्त झाला आहे. आता आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून स्वस्थ अकोला करण्याचा मनोदय व्यक्त करुन या योजनेचा लाभ जिल्हयातील 5 लाख लोकांना होणार आहे. ही योजना यशस्वी करण्याची खरी जबाबदारी आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्यमित्र यांची असून त्यांनी मन लावून ही योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना आरोग्य सुविधांचा लाभ मिळवून दयावा, असे त्यांनी सांगितले.
यावेळी मालनबी शमशाद अहमद, अनामिका अंभोरे, रामनारायण धनोकार, धरीज बेतवाल, पंकज सौंदळे, शारदा गायकवाड, लता धारस्कर, तारा शर्मा, बंडू घोटाळ, नलिनी टाले, गोविंद सारडा, कृष्णकांत शुक्ल, वासुदेव वाडेकर, सुनंदा गेडाम, रजियाबी इशरत जबीन, शकुंतला गव्हाळे या निवडक लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात या योजनेच्या ई-कार्डाचे वाटप मान्यवरांच्या यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आरती कुलवाल यांनी केले.
योजनेची वैशीष्टये – आयुष्यमान भारत योजना पूर्णपणे निशुल्क आहे. सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचा समावेश (गुडघा, खुबा, कोपर, प्रत्यारोपण), लहान मुलांच्या कर्करोगाचा उपचारांचा समावेश, मानसिक आजारावरील उपचारांचा समावेश, प्रति कुटुंब प्रति वर्ष 5 लाखाच्या रकमेचे मोफत उपचार, इतर राज्यातील लाभार्थी कुटुंबे योजनेचा लाभ घेऊ शकतात, कुटुंबाचा समावेश लाभार्थ्याचा यादीत होत असल्यास संगणक प्रणालीद्वारे कुटुंब सदस्यास ई-कार्ड मिळण्याची तरतूद, केंद्रचा 60 टक्के हिस्सा तर राज्याचा 40 टक्के हिस्सा, 1000 पेक्षा जास्त उपचारांचा लाभ, प्रधानमंत्री जन आरोगय योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या दोन्ही योजनांची एकत्रितपणे अंमलबजावणी, योजना पूर्णपणे संगणीकृत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरवातीला 79 शासकीय रूग्णालयांव्दारे लाभार्थ्यांना उपचार देणार, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या 489 अंगीकृत रूग्णालयांमार्फत पूर्वीप्रमाणे 971 उपचारांची सेवा मिळणार, अंगीकृत रूग्णालयात आयुष्यमान मित्रांची नेमणूक.
अधिक वाचा : जलयुक्त शिवारच्या कामांमध्ये दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही-जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola