नाशिक : नवीन मालमत्ता उतारा देण्यासाठी शासकीय फी व्यतिरिक्त १८० रुपये किंवा एक कोऱ्या कागदाचा रिम लाच म्हणून घेणाऱ्या येवला येथील उपअधीक्षक भूमी भिलेख कार्यालयातील निमताणदार या कर्मचाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले.मुरलीधर शंकर ठाकरे, असे ‘एसीबी’ने अटक केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. ‘एसीबी’कडे तक्रार करणाऱ्या तक्रारदारास सिटी सर्व्हे क्रमांक १८६ चा नवीन मालमत्ता उतारा देण्यासाठी शासकीय फी व्यक्तिरिक्त १८० रुपये किंवा एक कोऱ्या कागदाचा रिम लाच म्हणून ठाकरे यांनी मागितला होता. या प्रकरणी तक्रारदाराने लागलीच ‘एसीबी’कडे तक्रार केली. या तक्रारीवरून ‘एसीबी’ने लाचेच्या मागणीची पडताळणी करून शुक्रवारी येवला येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात सापळा रचला. यावेळी ठाकरे यांनी २२० रुपयांचा कागदाचा रिम स्वीकारताच ‘एसीबी’च्या अधिकाऱ्याने त्यास अटक केली. या प्रकरणी येवला पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.