अकोला – शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत हिताची असणारी शासनाची महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानातंर्गत केल्या जाणारी कामे गुणवत्तापूर्णपणे तथा जलदगतीने पूर्ण करण्यात यावीत. या कामांमध्ये कुठल्याही प्रकारे हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. जे संबंधीत अधिकारी सदर कामे जबाबदारीने करणार नाहीत, त्यांच्या विरुध्द कार्यवाई केली जाईल, अशी सूचना जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केली.
नियोजन भवनात आज जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, फळबाग लागवड, भारतीय जैन संघटनेमार्फत केली जाणारी जलसंधारणाची कामे याबाबत जिल्हाधिकारी यांनी सविस्तर आढावा घेतला. यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) अशोक अमानकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी, कृषी, जिल्हा परिषद, जलसंधारण, लघुसिंचन, भूजल सर्वेक्षण, पाटबंधारे, वनविभागाचे अधिकारी, टाटा ट्रस्टचे अधिकारी, जिल्हा पेट्रोल पंप असोसिएशनचे राहूल राठी, डाटा एन्ट्री ऑपरेटर आदी उपस्थित होते.
बैठकीत प्रारंभी सन 2016-17, सन 2017-18 आणि सन 2018-19 मधील जलयुक्त शिवार योजनेच्या कामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. प्रलंबित कामांबाबत त्यांनी यावेळी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. विशेषत: कृषी विभाग, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्याकडील जलयुक्तशी संबंधीत कामे मोठया प्रमाणात प्रलंबित असल्यामुळे त्यांनी या विभागाच्या अधिकाऱ्यांना कडक शब्दांत सुनावले.
सन 2016-17 आणि सन 2017-18 मधील झालेल्या कामांचे जिओ टँगीग तसेच ऑनलाईन माहिती भरण्याची कामे अदयाप प्रलंबित असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निदर्शनास आले. कृषी विभागाचे जिओ टँगीगचे सन 2016-17 चे काम 83 टक्के, जि.प.चे 80 टक्के, पंचायत समितीचे 66 टक्केच काम पूर्ण झाले आहे. तसेच सन 2017-18 चे कृषी विभागाचे 20 टक्के, वन विभागाचे 74 टक्के, पंचायत समितीचे 12 टक्केच जिओ टँगीगचे काम पूर्ण झाले आहे. तसेच ऑनलाईन माहिती भरण्याचे कामही प्रलंबित आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी या विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने ही कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले. कामे का अपूर्ण राहिले, यासाठी संबंधीतांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याबाबतही त्यांनी सूचना केली. डाटा एन्ट्री ऑपरेटरने ही सदर कामे गांभीर्याने पूर्ण करण्याबाबतही त्यांनी सूचित केले. ही कामे पूर्ण न केल्यास आपले वेतन रोखण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
जलयुक्त शिवारबाबतची कामे त्वरेने मार्गी लागावीत यासाठी संबधित अधिकारी, कर्मचारी यांनी तालुका मुख्यालयी हजर राहावे, कोणत्याही वेळेला मी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट देईल, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांनी जलयुक्त शिवारच्या कामांबाबत अधिक दक्ष राहावे, सर्व कामे जबाबदारीने आणि वेळेत पूर्ण होतील याची खबरदारी घ्यावी. कामे ही गुणवत्तापुर्णच झाली पाहिजे. अन्यथा कामांचे सोशल ऑडीट केले जाईल.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सन 2017-18 मधील कामांना मिळालेली प्रशासकीय मंजुरी, वर्क ऑर्डर, पूर्ण झालेली कामे, प्रलंबित कामे यांचा आढावा घेतला. झालेल्या काही कामांचा निधी का अदा करण्यात आला नाही, याविषयी त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. 2018-19 मधील कामांसाठी प्रशासकीय मंजुरी तातडीने घेऊन कामाला सुरुवात करण्याबाबत त्यांनी सूचित केले.
मागेल त्याला शेततळे अंतर्गत कामेही जलदगतीने पूर्ण करण्याबाबत सूचना करताना जिल्हाधिकारी म्हणाले की, कामांचे जिओ टँगीग आणि ऑनलाईन माहिती भरण्याचे काम तातडीने पूर्ण करण्याबाबत त्यांनी सूचना केली. जलयुक्त शिवार आणि मागेल त्याला शेततळे याबाबतच्या कामांची पाहणी करण्यासाठी पुढील आठवडयात मी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तालुकानिहाय दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय जैन संघटनेमार्फत करण्यात येणाऱ्या जलसंधारण कामांचाही जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. संघटनेमार्फत कामांसाठी मोफत जेसीबी पुरविले जाणार आहेत, तर इंधनाचा खर्च प्रशासनामार्फत दिला जाणार आहे. प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी पेट्रोलचालकांमार्फत डिझेल पुरविले जाईल, असे यावेळी श्री. राठी यांनी सांगितले. तसेच त्यांनी काही सूचनाही मांडल्या. त्याची निश्चितपणे दखल घेतली जाईल. असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. दरम्यान, शासनाच्या विविध महत्त्वाकांक्षी योजनेची जिल्हयात कशा प्रकारे अंमलबजावणी होत आहे, यांचे निरीक्षण करण्यासाठी पुढील महिन्यापासून विविध विभागांची सचिव स्तराची समिती येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.
अधिक वाचा : अधिकाऱ्यांच्या सकारात्मकतेमुळे जनतेच्या तक्रारींचे जलदगतीने निरासन; पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola