अकोला- या हंगामातही शेतकरी गंभीर परिस्थितीचा सामना करीत आहेत. जिल्ह्याच्या काही भागामध्ये पिके हातची गेली आहेत. या स्थितीमध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी २ आणि ३ ऑक्टोबर १८ रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख खासदार राजू शेट्टी अकोला जिल्ह्यात येत आहेत. २ ऑक्टोबर रोजी निंबा येथे तर पातूर नंदापूर येथे ३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता शेतकरी परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती विदर्भ प्रमुख देवेंद्र भुयार, अकोला संपर्कप्रमुख कैलास फाटे यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली. आधारभूत किमतीपेक्षा कमी दरात माल विकणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची भाषा शासनस्तरावर बोलली जात आहे परंतु कारखानदारांना तूर डाळ कमी दरात विकली गेली त्यावेळी हा नियम लागू का होत नाही.
अशावेळी मुख्यमंत्र्यांविरुद्ध गुन्हे दाखल करणार का, असा सवाल भुयार यांनी उपस्थित केला. येत्या काळात खामगाव येथे या मुद्द्यावर परिषद आयोजित करण्यात येत असल्याचे फाटे यांनी सांगितले. कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यानुसार शेतकऱ्यांना २४ तासात चुकारे झाले पाहिजे, परंतु तसे होत नाही. राज्यकर्त्यांचे हे अपयश असून, शेतकऱ्यांमध्ये या बाबत तीव्र भावना आहे, असे सांगण्यात आले.
बोंडअळीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, अकोला जिल्हा सहकारी बँकेकडून शेतकऱ्यांना दिले जात असलेले पीक कर्ज अत्यंत कमी आहे. ते वाढवून कोरडवाहूसाठी २५ हजार आणि बागायतीला ३० हजार रुपये द्यावे, यंदाची पावसाची परिस्थिती पाहून अकोला जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी अर्ज भरले नाहीत त्यांनाही पीक विम्यासाठी पात्र ठरवण्यात यावे, चालू वर्षात मळणी झालेल्या पिकांची हमी भावाने खरेदी करण्यात यावी, ई-नाम योजना ऐच्छिक करण्यात यावी, चालू वर्षात बोंडअळीने थैमान घालण्यास सुरुवात केली असून सर्व शेतकऱ्यांना फवारणीसाठी पैसे द्यावे तसेच तुरीचे राहिलेले चुकारे त्वरित द्यावे आदी मागण्या लावून धरण्यात येणार आहेत. पत्रकार परिषदेला संघटनेचे संपर्क प्रमुख चंद्रशेखर गवळी, उपजिल्हाप्रमुख दीपक ताले, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष गणेश खुमकर, सहसचिव कुणाल राठोड, युवा आघाडी सचिव सोनू कराळे, बार्शीटाकळी तालुकाध्यक्ष दीपक शेळके, मूर्तिजापूर तालुकाध्यक्ष कैलास साबे, विद्यार्थी संघटना संपर्क प्रमुख अक्षय खिरोडकर, सचिव अरविंद राठोड, रामेश्वर चिपडे उपस्थित होते.
अधिक वाचा : केळीवेळी आदर्श ग्राम मंडळाच्या अध्यक्षपदी किशोर बुले तर उपाध्यक्ष पदी भगवान आढे विजयी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola