अकोला (शब्बीर खान): सोन्याचे बिस्कीट विक्री असल्याचे सांगून सदर सोने स्वस्तात देण्याचे आमिष देऊन रोकड घेऊन येणाऱ्या खरेदीदाराला लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी रविवारी अटक केली. सदर टोळीतील आरोपींची १९ सप्टेंबर रोजी पोलीस कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. खंडेलवाल शोरूमजवळ सोन्याचे आमिष देऊन लुटमार करणारी टोळी असल्याची माहिती विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांना मिळाली होती. त्यांनी या टोळीवर पाळत ठेवून गुजरातमधील सुरत जिल्ह्यातील रहिवासी भिका साहेबराव पाटील, सुरत जिल्ह्यातील भानुदास जगन्नाथ ढोडे, सुरत जिल्ह्यातील गडोदरा येथील रहिवासी राजकुमार टीकाराम नागपात्रे, सुरत येथील एकता नगर सोसायटीमधील जयेश किशोर सेंदाने, सुरतमधील गडोदरा नेर येथील रवींद्र गोरख पाटील, नंदुरबार येथील रवींद्र प्रकाश नायस्कर, जळगाव खान्देश जिल्ह्यातील उटखोडा येथील राजू गुलाब पाटील या सात जणांना अटक केली होती. या टोळीकडून तलवार, धारदार शस्त्र, रोख सहा हजार रुपये, सात मोबाइल व एक चारचाकी वाहन असा एकूण सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्याविरुद्ध खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या टोळीतील आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींची कारागृहात रवानगी केली.