अकोला(शब्बीर खान)-कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकार क्षेत्रात कार्यरत वाशिम बायपास रोडवरील ढोरांचा बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे यांच्या आदेशाने बंद करण्यात आला आहे. या ढोर बाजाराला सोमवारी कुलूप लावण्यात आल्यामुळे ढोर बाजारात ढोर खरेदी -विक्रीसाठी कार्य करणाऱ्या २३ पालधारकांवर उपासमारीची वेळ आली असून हे पालधारक ढोर बाजार पूर्ववत सुरु करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. सन १९८५ पासून अकोल्यातील ढोर बाजार हा अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ताब्यात देण्यात आला आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालिन सभापती स्व. वसंतराव धोत्रे यांनी हा बाजार आतापर्यंत सुरू ठेवला होता; मात्र एक महिन्यापूर्वी वसंतराव धोत्रे यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांचे अधिकार आता त्यांचे पुत्र तथा अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे यांच्याकडे आले आहेत. त्यांना या ढोर बाजारातून महिन्याला किमान २ लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे; मात्र ते मिळत नसल्याने त्यांनी हा ढोर बाजारच बंद करण्याचा निर्णय घेतला आणि सोमवारी या बाजाराला कुलूपदेखील लावले. परिणामी या बाजाराच्या भरवशावर आपला उदरनिर्वाह करणारे २३ पालधारक यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे तसेच या बाजारात बांधलेल्या ढोरांचे चारा – पाणीही बंद करण्यात आले असल्याने त्यांचे प्राण जाऊ शकतात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीने आपला निर्णय मागे घ्यावा आणि बाजार पुन्हा सुरु करावा अन्यथा आंदोलन सुरू करण्याचा इशारा या पालधारकांनी दिला असून, त्याची जबाबदारी सभापती शिरीष धोत्रे यांची असेल, असेही त्यांनी म्हटले आहे. आता शिरीष धोत्रे कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.