वाशीम (सुनील गाडगे) – शुक्रवारपेठ भागातील राजगुरु गल्लीतील सुमारे 70 वर्षाची विधायक उपक्रमाची परंपरा लाभलेल्या श्री विठ्ठल गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदा गणेशोत्सवामध्ये सलग दहा दिवस विविध सामाजीक व विधायक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत रविवार, 16 सप्टेंबर रोजी मंडळाच्या वतीने केकतउमरा येथील चेतन सेवांकुर ग्रुपच्या दिव्यांग मुलांना भांडी व फराळाचे वाटप त्यांच्या निवाससस्थानी जावून करण्यात आले.
मंडळाच्या वतीने दहा दिवसात सकाळी 5 ते 7 या वेळेमध्ये गणेश मंडपामध्ये जेष्ठ नागरीक, महिला व पुरुषांकरीता दररोज योगसाधना व प्राणायाम शिबीर पतंजली योग समितीचे कोषाध्यक्ष डॉ. भगवंतराव वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येत आहे. त्यासोबतच परिसरात वृक्षारोपण, वृक्षसंर्वन, शाळांमध्ये आपत्ती व्यवस्थापन शिबीर, सार्वजनिक गणेश मंडळांना वृक्षांचे वाटप, लहान मुलांसाठी बौध्दीक स्पर्धा, दिव्यांग वसतीगृहामध्ये फळवाटप, व्यसनमुक्ती मार्गदर्शन शिबीर, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, चित्रकला व रंगभरण स्पर्धा, रोजगार मार्गदर्शन शिबीर, आरोग्य शिबीर, सामान्य ज्ञान परिक्षा, बेटी बचाव बेटी पढाव कार्यक्रम, संगीत रजनी व नृत्य स्पर्धा व शेवटच्या दिवशी टाळ मृदंगाच्या गजरात मिरवणूक आदी भरगच्च सामाजीक उपक्रम राबविण्यात येत आहेत. याअंतर्गत 14 सप्टेंबर रोजी आयुडीपी येथील श्री संत गजानन महाराज मंदिराच्या आवारात विविध जातीच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले. 15 सप्टेंबर रोजी लहान मुलांसाठी बौध्दीक स्पर्धा घेण्यात आली. तसेच 16 सप्टेंबर रोजी योग प्रशिक्षक भगवंतराव वानखडे, किशोर वाघमारे, सुखदेव राजगुरु, मनिष राजगुरु, कैलास राजगुरु, विठ्ठल राजगुरु, सुरज इंगळे, गजानन राजगुरु, अविनाश राजगुरु, ओंकार दरवेश्वर आदींच्या हस्ते केकतउमरा येथील पांडुरंग उचितकर यांनी पालकत्व घेतलेल्या दिव्यांग मुलांमुलींना रोज वापरता येण्याजोगे जेवणाची भांडी व फराळाचे वाटप करण्यात आले. श्री विठ्ठल मंदिर संस्थान अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या श्री विठ्ठल गणेश मंडळाचे यंदाचे 70 वे वर्ष असून या सर्व विधायक कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, सदस्य व सर्व पदाधिकारी, परिसरातील नागरीक, महिला भगिनी व बालकांचे अमुल्य सहकार्य मिळत आहे.