अकोला- अकोला शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात श्री गणरायाची भक्तिभावाने स्थापना करण्यात आली. गुरुवारपासून दहा दिवस लोकोत्सव साजरा होणार आहे. गणेशोत्सवाचे यंदाचे शतकोत्तर रजत जयंती वर्ष असल्याने त्याचे प्रत्यंतर मंडळाच्या एकूणच तयारीमध्ये येत आहे. हर्षोल्हासात गणेशभक्तांनी मूर्तींची स्थापना केली.
शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी दोन तीन दिवसांपूर्वीच मूर्ती मंडपात आणून ठेवल्यात. तसेच घरी स्थापना करण्यासाठी देखील बरेच जण गणेश चतुर्थी पूर्वी मूर्ती आणतात. अकोला क्रिकेट क्लब मैदानासह महानगराच्या अन्य भागातही मूर्ती मोठ्या प्रमाणात विक्रीला होत्या. गुरुवारी सकाळपासून स्थापनेचा मुहूर्त असल्याने दुपारपर्यंत बहुतांश ठिकाणी स्थापना झाली. जिल्ह्यात १७७३ मंडळे, तर अकोला शहरात २९५ मंडळांची स्थापना झालेली आहे.
वाद्यांच्या गजरात मूर्ती नेण्यात येत होत्या. अकोला क्रिकेट क्लब मैदानावरील गर्दी पाहता या ठिकाणी एक मार्गी वाहतूक सुरू होती. अकोल्यातील लालबागचा राजा, अर्जुन गणेशोत्सव मंडळ, तेलीपुरा गणेशोत्सव मंडळ, सिंधी कँपमधील बालक गणेशोत्सव मंडळ, आझाद मंडळ, कल्याण मंडळ, मारवाडी प्रेस गणेशोत्सव मंडळ, रतनलाल प्लॉट तसेच शहराच्या विविध भागांमध्ये मोठ्या मूर्ती बसवण्यात आल्या आहेत. काही मंडळांनी बऱ्हाणपूर येथून मूर्ती मागवल्या आहेत. गणेशोत्सवसाठी या सकाळपासून शहराच्या चौकाचौकात पोलिस शिपाई तैनात होते. वाहतूक पोलिसही रहदारीला अडथळा येणार नाही, यासाठी वाहतूक निरीक्षक विलास पाटील यांच्या मार्गदर्शनात यंत्रणा चोख ठेवली होती.
अकोल्याच्या गणेशोत्सवात बाराभाई गणपती पहिल्या मानाचा आहे. जुन्या शहरात शीतलामाता मंदिराकडे जाताना बाराभाई गणपती मंदिर आहे. मानाच्या गणपतीची देखील सकाळी विधिवत पूजा अर्चा केली. विसर्जन मिरवणुकीत पहिला मान बाराभाई गणपतीला असतो.
बऱ्याच लोकांनी आग्रहाने शाडू मातीच्या मूर्तींची मागणी केली. मिक्स नको तर मातीचीच मूर्ती हवी अशी विक्रेत्यांकडे मागणी करताना बरेच भाविक दिसले. पीओपी मूर्ती अनेकांनी नाकारल्या. यंदा माती मूर्ती विक्रीची दुकानेही शहरात मोठ्या प्रमाणात दिसून आली. पर्यावरणपूरक बाप्पाची स्थापनाही मोठ्या संख्येत झाली. या बाबत झालेल्या जागृतीचा हा परिणाम ठरला.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola