आपला मोबाईल नंबर न बदलता ऑपरेटर बदलण्याची सुविधा म्हणजेच मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी (MNP) आता आणखी सोपी होणार आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) लवकरच पोर्टेबिलिटीसाठी लागणारा वेळ ७ दिवसांवरुन २ दिवस करण्याच्या तयारीत आहे. MNP सहज होण्यासाठी ट्रायकडून एप्रिलमध्ये मसुदा तयार करण्यात आला होता. यात MNPबाबत नवी नियमावली तयार करण्यात आली होती.
नवे नियम लागू झाल्यानंतर मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी करण्यासाठी ग्राहकांना ७ दिवस वाट पहावी लागणार नाही. ग्राहकांना २ दिवसांत आपला मोबाईल ऑपरेटर बदलता येणार आहे. भारतात जम्मू काश्मीर आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये यासाठी १५ दिवस लागतात.
मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी
या सुविधेमुळे ग्राहकाला आपला नंबर न बदलता ऑपरेटर बदलता येतो. यासाठी ग्राहकांना १९०० या नंबरवर PORT Mobile Number असा मेसेज करावा लागतो. त्यानंतर युनिक पोर्टिंग कोड (युपीसी) चा मेसेज येतो.
मोबाईलवर आलेला युपीसी कोड आणि ओळखपत्र जवळच्या रिटेलरजवळ जाऊन पोर्टेबिलिटी करता येते. यासाठी सध्या ७ दिवस लागतात. तसेच यापूर्वी ट्रायने या सेवेसाठी असलेले १९ रुपयांचे शुल्क ४ रुपये केले आहे.
अधिक वाचा : एटीएम मधून आता कार्ड शिवाय पैसे काढता येणार