अकोला : जलसंधारणाच्या कामात भारतीय जैन संघटनेचे काम अत्यंत कौतुकास्पद आहे, सुजलाम सुफलाम अकोला अंतर्गत आपला जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी ही संघटना जलसंधारणाच्या कामाकरीता विनामुल्य मशिन्स उपलब्ध करुन देणार आहे, या संधीचे निश्चितपणे सोने केले जाईल आणि ही संघटना आणि प्रशासनाच्या सहकार्यातून अकोला जिल्हा सुजलाम सुफलाम केला जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले.
अकोला जिल्हा कायम दुष्काळ मुक्त करण्यासाठी सुजलाम सुफलाम अकोला अभियानातंर्गत मृद व जलसंधारण विभाग आणि भारतीय जैन संघटना यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराप्रमाणे जलसंधारण कामे अंमलबजावणीबाबत आज नियोजन भवनात कार्यशाळा पार पडली.
त्यावेळी पालकमंत्री अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तथा खासदार संजय धोत्रे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई वाघोडे, आमदार गावर्धन शर्मा, आमदार बळीराम सिरस्कार, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा, विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, माजी राज्य मंत्री अजहर हुसेन, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, भारतीय जैन संघटनेचे राज्य अध्यक्ष अमर गादिया, जिल्हा अध्यक्ष सुभाष गादिया आदी उपस्थित होते.
पृथ्वीतलावर पाणी हा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे, त्यामुळे त्याचा प्रत्येक थेंब वाचवणे गरजेचे आहे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून राज्यात जलसंधारणाची मोठया प्रमाणात कामे झाली आहेत. यामध्ये शासन, प्रशासनाबरोबरच लोकसहभागाचा मोठा वाटा आहे. जलसंधारणाच्या कामासाठी भारतीय जैन संघटनेने केलेले सहकार्यही बहुमुल्य आहे. मागील वर्षी बुलडाणा जिल्हयात या संघटनेने उत्कृष्ट काम केली आहेत. यावर्षी ही संघटना अकोला जिल्हयात प्रशासनाच्या मदतीने जलसंधारणाची कामे करणार आहेत. या कामांसाठी शासन या संघटनेच्या पाठीशी आहे. जलसंधारणाच्या कामांसाठी ठरविण्यात आलेले उदिष्ट वेळेत पूर्ण करुन अकोला जिल्हा निश्चितपणे दुष्काळमुक्त केला जाईल.
खासदार श्री. धोत्रे म्हणाले की, प्रशासन आणि भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून अकोला जिल्हयात केल्या जाणाऱ्या जलसंधारणाच्या कामातून जिल्हयात मोठया प्रमाणात जलसाठे निर्माण होऊन शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. याचबरोबर पर्यावरणाच्या दृष्टीने टेकडयांवर मोठया प्रमाणात वृक्ष लागवड करुन त्या संरक्षित कराव्यात, यासाठी सर्वांचेच सहकार्य राहिल.
श्री. डवले म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियानातंर्गत अकोला जिल्हयात अनेक कामे झाली आहेत. परंतु संपूर्ण अकोला जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून सुजलाम सुफलाम अकोला अभियान राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत आगामी 15 जून पर्यंत जलसंधारणाची मोठया प्रमाणात कामे केली जातील. विशेषत: खारपाणपटटयात अधिकाधिक कामे करण्याबरोबरच जिल्हा टँकरमुक्त केला जाईल.
श्री. मुथा म्हणाले की, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आणि महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी भारतीय जैन संघटना जलसंधारणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत आहे. बुलडाणा जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसंधारणाच्या कामाकरीता संघटनेने मार्च महिन्यात सुमारे 134 जेसीबी मशिन व पोकलेन उपलब्ध करुन दिले. अवघ्या तीन महिन्यांत या जिल्हयात जलसंधारणाची अनेक कामे झाली. आता अकोला जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी आम्ही मशिन उपलब्ध करुन देणार आहोत. यासाठी प्रशासनाला आमचे संपूर्ण सहकार्य राहिल. सर्वांच्या समन्वयातून अकोला दुष्काळमुक्त केला जाईल, अशी ग्वाही देत त्यांनी जलसंधारणाच्या कामासाठी येत्या तीन दिवसांत 40 जेसीबी मशिन उपलब्ध करुन देण्यात येतील, असे सांगितले.
विभागीय आयुक्त पियुष सिंह म्हणाले की, अमरावती विभागात जलयुक्त शिवार अभियानातंर्गत चांगली कामे झाली आहेत. विशेषत: भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून बुलडाणा जिल्हयात उल्लेखनीय कामे करण्यात आली आहेत. यावर्षी या संघटनेच्या माध्यमातून अकोला आणि वाशिम जिल्हयात भरीव कामे केले जातील. यामुळे नवीन जलसाठे निर्माण होण्याबरोबरच टँकरची संख्या निश्चितपणे कमी होईल.
प्रास्ताविक करताना जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय म्हणाले की, दि. 28 जून 2018 रोजी भारतीय जैन संघटना आणि मृद जलसंधारण विभाग यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार बुलडाणाच्या धर्तीवर भारतीय जैन संघटनेच्या सहकार्यातून अकोला जिल्हयात या वर्षी मोठया प्रमाणात जलसंधारणाची कामे केली जाणार आहेत.
ही संघटना कामासाठी जेसीबी मशिन व पोकलेन विनामुल्य उपलब्ध करुन देणार आहेत, तर प्रशासन इंधनाचा पुरवठा करणार आहे. जलसंधारणाच्या कामांसाठी सुक्ष्म नियेाजन करण्यात आले असून वेळापत्रकानुसार सर्व कामे पूर्ण करण्यात येतील. साधारण 4 हजारांपेक्षा जास्त कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. वेळेच्या आत सर्व कामे पूर्ण करुन अकोला जिल्हा दुष्काळमुक्त केला जाईल.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई वाघोडे, माजी राज्यमंत्री अजहर हुसेन यांनीही मार्गदर्शन केले. जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. बोके यांनी अकोला जिल्हयातील प्रस्तावित जलसंधारणाच्या कामांचे सादरीकरण केले. पाणी फाउंडेशन अंतर्गत जिल्हयात करण्यात आलेल्या उत्कृष्ट कामांबददल यावेळी श्री. डवले साहेबांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई वाघोडे, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठातील शेततळी आणि जलसंधारणाच्या कामातून पुर्नजिवीत करण्यात आलेली कमळगंगा नदी यावर कॅमेरामन चंद्रकांत पाटील यांनी तयार केलेली चित्रफित दाखविण्यात आली.
कार्यशाळेत श्री. डवले साहेब यांनी जलसंधारण कामांबाबत तांत्रिक बाबीसंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच बुलडाणाचे निवासी उपजिल्हाधिकारी ललीत वराडे, जलसंधारण विभागाच्या उपअभियंता क्षितीजा गायकवाड, कृषी अधिकारी श्री. ढगे यांनी भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून बुलडाणा जिल्हयात करण्यात आलेल्या जलसंधारण कामांचे नियोजन याबाबत मार्गदर्शन केले. सदर संघटनेचे बुलडाणा जिल्हा समन्वयक राजेश देशलहरा यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. आभार उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर यांनी मानले. सूत्रसंचालन शैक्षणिक गुणवत्ता कक्षाचे समन्वयक प्रकाश अंधारे यांनी केले. कार्यशाळेस उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, कृषी, जलसंधारण, भूजल सर्वेक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
अधिक वाचा : महीलाविरोधात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या राम कदमाविरूध गुन्हे दाखल करा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola