अकोला : गणेशोत्सव हा आनंदाचा व मांगल्याचा उत्सव आहे, हा उत्सव दरवर्षीप्रमाणे शांततेची परंपरा कायम ठेवून यंदाही सकारात्मक वातावरणात उत्साहाने, आनंदाने साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले.
दि. 13 सप्टेंबर 2018 पासून गणेशोत्सवाला प्रारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक आज नियोजन भवनात पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी मार्गदर्शन करताना बोलत होते. बैठकीस महापौर विजय अग्रवाल, आमदार गोपीकिशन बाजोरिया, माजी राज्य मंत्री अझर हुसैन, जिल्हयातील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंह मोहता, सचिव सिध्दार्थ शर्मा, पोलीस अधिक्षक एम. राकेश कलासागर, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, हरिष अलीमचंदानी, संग्राम गावंडे आदींसह पोलीस अधिकारी, तहसिलदार, गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य राहिल, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, गणेशोत्सव हे भारतीय संस्कृतीचे महत्त्वाचे अंग आहे. त्यामुळे हा उत्सव आनंदाने, सुखाने व नियामांचे पालन करुन साजरा करावा. उत्सवाच्या काळात स्वच्छतेवर भर दयावा. पर्यावरण व सामाजिक दृष्टया नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या गणेश मंडळांना सर्वोत्कृष्ट गणेश मंडळाचा पुरस्कार देण्यात येईल. कुठल्याही प्रकारे उत्सावाला गालाबोट लागणार नाही, याची काळजी घ्या. अफवांवर विश्वास ठेवू नका. सर्व नियमांचे पालन करा. सुरक्षेसाठी पोलीसांना सहकार्य करा. सर्व अडचणी तात्काळ सोडवल्या जातील.
पोलीस अधीक्षक राकेश कलासागर म्हणाले की, उत्सव काळात सुरक्षेच्याबाबत सर्वतोपरी दक्षता घेतली जाईल. गणेश मंडळांना एकाच ठिकाणी सर्व परवानग्या मिळण्याकरीता महानगर पालिकेत एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. ध्वनीप्रदुषण, वाहतुककोंडी टाळण्यासाठी सजग राहावे. विसर्जनाच्या ठिकाणी पुरेशी दक्षता घ्या. सोशल मिडियावर कुठल्याही प्रकारची अफवा पसरवू नका. गैरप्रकार आढळल्यास तत्काळ पोलीसांना संपर्क साधा.
महापौर विजय अग्रवाल म्हणाले की, महानगर पालिकेकडून पिण्याच्या पाण्याची सोय, चांगले रस्ते, लाईट आदी सुविधा सज्ज् ठेवल्या जातील. या व्यतिरिक्त मिरवणूक मार्गावरील रस्तयांची डागडुजी केली जाईल. यावेळी आमदार गोपीकिशन बाजोरिया, सार्वजनिक मंडळाचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंह मोहता, सचिव सिध्दार्थ शर्मा, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, संग्राम गावंडे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश माने यांनी केले. यावेळी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अडचणी मांडल्या. त्याचे निरसन जिल्हाधिकारी यांनी केले. सूत्रसंचालन प्रकाश अंधारे यांनी केले.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola