विदयार्थ्यांसाठी आर्थिक,शैक्षणिक सवलती व विविध योजनांबाबत कार्यशाळेला उत्स्फुर्त प्रतिसाद
अकोला – शासनाच्या आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील विदयार्थ्यांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजना, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना आदि योजना शासनातर्फे राबविण्यात येतात. आर्थिकदृष्टया दुर्बल घटक विदयार्थ्यांसाठी असलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहचविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन गृहराज्यमंत्री तथा अकोला जिल्हयाचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले.
मराठा समाजाच्या तसेच आर्थिकदृष्टया मागासलेल्या विदयार्थ्यांसाठी आर्थिक, शैक्षणिक सवलती व विविध योजनांबाबत आज 30 ऑगस्ट 2018 रोजी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात भव्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या कार्यशाळेला हजारोंच्या संख्येनी विदयार्थ्यांनी उपस्थित राहून प्रतिसाद दिला.या कार्यशाळेला जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, माजी आमदार वसंतराव खोटरे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, शासकीय अध्यापक महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. मानेकर, सहायक समाज कल्याण आयुक्त अमोला यावलीकर, शासकीय तंत्रनिकेतन मुर्तिजापूरचे विभाग प्रमुख अजय वाघमारे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे भुषण भोईटे, शिक्षणाधिकारी प्रकाश मुकूंद , तहसिलदार विजय लोखंडे, कोचिंग क्लासेसचे व्यवस्थापक अजय कुटे, राजदत्त मानकर , विठ्ठल गाडे, संजय जायले, संदिप पाटील, आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांच्या विदयार्थ्यांसाठी विविध योजना करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे उपसमिती निर्माण करून शासन निर्णय काढण्यात आले. आर्थिकदृष्टया मागसवर्गीय विदयार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्हयात वसतीगृह तयार करण्यात आले. शासनाच्या विदयार्थ्यांसाठी विविध योजनांची माहिती व्हावी. यासाठी थेट संपर्क करता यावा म्हणून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सांगितले.
जिल्हयात आर्थिकदृष्टया मागासवर्गीय विदयार्थ्यांसाठी अकोला येथील शासकीय अध्यापक महाविदयालयात 100 विदयार्थ्यांची तसेच विदयार्थींनीची सोय असलेले सुसज्ज वसतीगृह 15 ऑगष्ट पासून सुरू करण्यात आले आहे. या वसतीगृहामध्ये अभ्यासिका ,क्रिडांगण , व्यायामशाळा व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले.
रक्ताच्या नात्यात कोणाचीही जात वैधता प्रमाणपत्र असल्यास इतर नातेसंबंधातील विदयार्थ्यांना जात वैद्यता प्रमाणपत्र मिळण्याबाबत विलंब लागणार नाही. अकोला जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने या जुलै महिन्यात एकाच दिवशी 1200 जात वैधता प्रमाणपत्र विदयार्थ्यांना वितरीत करण्यात आले अशी माहिती पालकमंत्री यांनी दिली.
पालकमंत्री जनता तक्रार निवारण सभेत विदयार्थ्यांसाठी वेळ राखुन ठेवणार विदयार्थ्यांचे शैक्षणिक अडचणी व इतर समस्या सोडविण्यासाठी दर पहिल्या व तिस-या सोमवारी पालकमंत्री तक्रार निवारण सभेत सकाळी 10.30 ते 11.30 असा वेळ विदयार्थ्यांसाठी राखून ठेवण्यात आले असल्याचे सांगून विदयार्थ्यांनी आपल्या समस्या बाबत पालकमंत्री जनता तक्रार निवारण सभेत उपस्थित राहून तक्रार करावी असे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले.शासन निर्णयाप्रमाणे कोणत्याही विदयार्थ्यांला अडचण असल्यास ती सोडविण्यासाठी प्रशासन सदैव सहकार्य करेल असे आश्वासन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिले. जात प्रमाणपत्र वेळीच विदयार्थ्यांना वितरीत करावे असे निर्देश सर्व उपविभागीय अधिका-यांना दिले असून जात प्रमाणपत्र मिळण्याबाबत कोणतीही अडचण विदयार्थ्यांना असल्यास नियमाप्रमाणे त्यावर कार्यवाही होवून ती अडचण सोडविण्यात येईल. असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. यावर्षी जात वैधता प्रमाणपत्राची 1200 प्रकरणे एकाच दिवशी निकाली काढून जिल्हाप्रशासनाने विदयार्थ्यांना दिलासा दिला आहे. असेही ते म्हणाले. शासनाच्या विविध योजनांच्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबध्द असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने दर महिन्याच्या 5 तारखेला स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन वर्गाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात करण्यात येते. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींचे मार्गदर्शन असते. तरी या मार्गदर्शन वर्गाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित या कार्यशाळेत समाज कल्याण विभागाचे सहायक आयुकत अमोल यावलीकर यांनी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणा-या विविध शिष्यवृत्ती योजनांची माहिती पॉवर पाँईट प्रेझेनटेंशन व्दारे दिली. मुर्तिजापुर येथील शासकीय तंत्रनिकेतनचे विभागप्रमुख अजय वाघमारे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना आणि डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना यांची माहिती दिली.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे भुषण भोईटे यांनी वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना , गट कर्ज व्याज परतावा योजना , गट प्रकल्प कर्ज योजना याबाबतची माहिती दिली.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्यघाटन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संचलन प्रकाश अंधारे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी मानले.विदयार्थ्यांनी प्रतिक्रीया व्यक्त करून मानले आभार. यावेळी प्रतिक्रीया व्यक्त करतांना विदयार्थ्यांनी शासनाच्या विदयार्थ्यांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती तळागाळा पर्यंत पोहचविण्यासाठी प्रचार , प्रसार व जनजागृती यासाठी प्रत्येक विदयार्थी प्रयत्न करतील अशी ग्वाही दिली.
आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील विदयार्थी केवळ निधी अभावी अभ्यासक्रमापासुन वंचित राहु नये म्हणून एक सामाजिक बांधिलकी व घटनात्मक उत्तरदायीत्व निभावणारे धोरणात्मक निर्णय महाराष्ट्र शासनाने मागील काही दिवसात घेतले आहे. हे निर्णय विदयार्थी व संस्थांपर्यंत पोहोचवून त्यांचा प्रत्यक्ष लाभ त्यांना मिळावा यासाठी शासनाच्या योजनांची माहिती दिली याबद्दल विदयार्थ्यांच्यावतीने पालकमंत्री तसेच जिल्हा प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात आले. अशा प्रकारची माहिती विदयार्थ्यांना शिक्षकाव्दारे प्रत्येक शाळेतून देण्यात यावी अशी आशा विदयार्थ्यांनी व्यक्त केली. यावेळी आपल्या भावना व्यकत करतांना पालक म्हणून सौ. लता गांवडे यांनी पालकमंत्री यांना विकास पुरूष म्हणून संबोधन करून आभार मानले. या कार्यशाळेला विविध शाळांचे प्राचार्य , मुख्यध्यापक , कोचिंग क्लासेसचे संचालक, विदयार्थीं/विदयार्थींनी उपस्थित होत्या.
अधिक वाचा : सामाजिक जबाबदारी समजुन जलसंवर्धन आवश्यक
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola